नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती होय. मकर संक्रांत हा परस्पर नात्यातला गोडवा वाढवणारा सण आहे. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी केली जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाही. तो का साजरा करतात? कसा साजरा करतात? जाणून घेऊया भोगी सणाबद्दल.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी. या वर्षी भोगी १३ तारखेला सोमवारी आहे. याच दिवशी शाकंभरी पौर्णिमाही आहे. तसेच याच दिवशी शाकंभरी नवरात्री समाप्ती होईल.
पौर्णिमा ही सोमवार दि.१३ जानेवारी २०२५ ह्या तारखेला पहाटे ०५ वाजून ०३ मिनिटांनी प्रारंभ होत आहे आणि मंगळवार १४ जानेवारी २०२५ ह्या तारखेला पहाटे ०३ वाजून ४७ मिनिटांनी पौर्णिमा संपते आहे.
भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणार. भोगी साजरी करण्याची पद्धत भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो. हा दिवस उपभोग आणि उपभोगाचे प्रतीक मानला जातो. भोगीमागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीने साजरी केल्याने जीवनात सकारात्मकता येते.
हा दिवस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि पापांपासून मुक्ती मिळवतो असे मानले जाते. भोगीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्या भाजीला भोगीची भाजी असे म्हणतात व तीळ लावून बाजरीची भाकर बनवली जाते.
ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे साडेचार ते साडेपाच अशी आहे. अशा वेळी उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. जर ब्रह्म मुहूर्तावर उठणे शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी तरी उठावे. भोगीच्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना केसावरुन आंघोळ करण्यास सांगतात. परंतु भोगीच्या दिवशी केस धुण्याला इतकं महत्व का दिल जात असा प्रश्न सर्वांना पडतो. याच कारण म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो आणि विविध रोगांपासून मुक्तता मिळते असे सांगितले जाते.
भोगी दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकावे. पांढऱ्या तीळांनी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते, असा समज आहे. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे.
संबंधित बातम्या