मराठी बातम्या  /  धर्म  /  Makar Sankranti : कशी करतात मकर संक्रांतीची पूजा? तीळगुळाचे महत्त्व काय? वाचा!

Makar Sankranti : कशी करतात मकर संक्रांतीची पूजा? तीळगुळाचे महत्त्व काय? वाचा!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 14, 2024 06:16 PM IST

Makar Sankranti Sahitya And Puja : मकर संक्रांत हा सण नववर्षाचा पहिला सण आहे. या सणाचे ऋतूमानानुसार फार महत्व आहे. जाणून घ्या मकर संक्रांतीची साहित्यासह संपूर्ण पूजा पद्धत आणि तीळ व गुळाचे महत्व.

Makar Sankranti 2024
Makar Sankranti 2024

मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयाचा अतिशय महत्त्वाचा सण आहेत , यावर्षी दिनांक १४ ला भोगी, १५ ला मकर संक्रांती, १६ ला किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे.

उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.संक्रांती पर्वकाळात स्नान , दान धर्म आदी पुण्य कृत्य केले असता त्याचे फल शतगुणित होते.या पर्वकाळात जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होते.

इ स १९७२ सालापासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांत १६ जानेवारीला येईल. तर ३२४६ मध्ये मकर संक्रांत चक्क १ फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासकांची आहे.

मकर संक्रांती पूजा साहित्य

पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कापड, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

मकर संक्रांती पूजा पद्धत

पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तीळ-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्यासोबत कशाचीही कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. तीळ हा खरंतर उष्ण मानला गेला आहे. मात्र मकर संक्रांतीच्या वेळेस हवेतला गारवा खूप जास्त असल्याने तिळाला महत्व प्राप्त झालं आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नैवेद्य बनवतात.

मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिळगुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तीळगुळ घ्या गोड बोला”

पौराणिक महत्व

एकदा शनिदेवांवर त्यांचे वडील चांगलेच संतापले होते. त्यांच्या संतापाला आवर घालण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करुन पाहिले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मग हताश झालेल्या शनिदेवांनी तिळाची पूजा केली. तेव्हा मात्र भगवान सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिला वरदान दिलं की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिळाने पूजा कर. त्यांन सारे दोष नाहीसे होतील. तेव्हापासून तिळाला महत्व प्राप्त झालं आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना त्यांची तिळाने पूजा केली जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य, शनी आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते. तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते याशिवाय शनिमहाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो.

WhatsApp channel