Dr. Ambedkar Bodhisattva: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना असंख्य बिरुदांनी, विशेषणांनी संबोधले जाते. भारतरत्न, विश्वरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे बाबा, दलितांची आई, क्रांतीसूर्य, प्रकांडपंडित, कायदेपंडित अशा अनेक सार्थ संज्ञांनी बाबासाहेबांना संबोधले जाते. मात्र, या संबोधनांमध्ये बोधिसत्व ही उपाधी अतिशय वेगळी अशी आहे. बोधिसत्व म्हणजे काय आणि बाबासाहेब बोधिसत्व कसे, हे जाणून घेऊ या.
बोधिसत्व हा शब्द बौद्ध धर्माशी संबंधित आहे. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बोधिसत्व या शब्दाची व्याख्या आणि विश्लेषण आपल्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या शेवटच्या ग्रंथात केली आहे. बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व अशी व्याख्या बाबासाहेबांनी केली आहे. बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची १० स्थित्यंतरे बोधिसत्व असतो. या १० अवस्थांना दस पारमिता म्हणतात. पारमिता म्हणजे परिपूर्णतेच्या अवस्था.
बोधिसत्व हा जगाच्या कल्याणाकरता, लोककल्याणाकरता, शांती आणि मानवाच्या आनंदासाठी झटणारी व्यक्ती असतो. बौद्ध धर्मात जो पुढे बुद्ध बनेल अशी व्यक्ती बोधिसत्व असते. बाबासाहेबांना करुणावान, प्रज्ञावान आणि लोककल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारा महापुरुष म्हणून जग ओळखते. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना बोधिसत्व ही उपाधी प्राप्त झाली आहे.
दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, क्षांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा या बौद्ध धम्मातील १० पारमिता आहेत. बोधिसत्व आपल्या जीवनकाळात या १० पारमिता पूर्ण करतो. त्यानंतर त्याला बुद्धत्व प्राप्त होते. बौद्ध धर्मातील प्रसिद्ध जातक कथा या पारमितांवरच आधारलेल्या आहेत.
१९५१ मध्ये श्रीलंकेत वर्ड बुद्धिस्ट फेलोशीपचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बाबासाहेब उपस्थित होते. तेथे बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम बोधिसत्व संबोधित करण्यात आले होते. पुढे ब्रह्मदेशात सन १९५६ साली सहाव्या बौद्ध संगितीमध्ये बौद्ध भिक्खूंच्या संघाने बाबासाहेबांना बोधिसत्व म्हटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वीच त्यांना बोधिसत्व या उपाधिचे संबोधन मिळाले. सन १९५५ साली नेपाळ देशातील काठमांडू येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद पार पडली. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाचारण करण्यात आले होते. तेथे सहभागी असलेल्या बौद्ध भिक्खूंनी बाबासाहेबांना बोधिसत्व ही उपाधी बहाल केली. पुढे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटले असताना त्यांनी सुद्धा बाबासाहेबांना बोधिसत्व असे संबोधले होते. बाबासाहेबांची विद्वत्ता, प्रज्ञा, त्यांची मानवी समाजाबद्दलची करूणा, दलित, पीडित, वंचितांसाठी त्यांनी वाहून घेतल्याने त्यांचा हा त्याग जगाने पाहिला. या त्यागाच्या आधारे बाबासाहेब बोधिसत्व ठरले.
१. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : हे बुद्धांचे ज्ञान दर्शवितात व त्यांच्या हातात अनमोल भारतीय राज्यघटना आहे.
२. बोधिसत्व क्वान ऑम : ह्या बुद्धांची दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग आहे.
३. बोधिसत्व पद्मपाणि : हे बुद्धांची करुणा दर्शवितात व त्यांच्या हातात कमळाचे फुल आहे.
४. बोधिसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.
संबंधित बातम्या