Maharaprinirvan Din 2024: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाजसुधारक, कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ आणि जगप्रसिद्ध विद्वान होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि ज्ञान जातीयवाद निर्मूलन आणि गरीब, दलित, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राची पुण्यतिथी देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. आपल्या आयुष्याच्या शेवटी बाबासाहेबांना १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. परिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्त्व आणि ध्येय आहे. याचा अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण' असा होतो. बौद्ध धर्मानुसार निर्वाणाची प्राप्ती करणारा व्यक्ती सांसारिक इच्छा, मोह आणि मायेपासून मुक्त होतो.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्यांचे अनुयायी त्यांना अभिवादन करतात. त्यांच्या पुतळ्यांना आणि तसबिरींना पुष्पहार अर्पण करतात. दिवे आणि मेणबत्त्या उजळून त्यांना आदरांजली वाहतात. अनेक ठिकाणी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम होतात. त्यांचे विचार आठवण्याबरोबरच त्यांची संघर्षगाथाही सांगितली जाते.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीचे (दलित) होते. त्यांचे पूर्वज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दीर्घकाळ कार्यरत होते. त्यांचे वडील ब्रिटिश सैन्याच्या महू छावणीत सुभेदार होते.
२. लहानपणापासूनआर्थिक, सामाजिक भेदभाव पाहणाऱ्या आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास सुरू केला. शाळेत त्यांना मोठ्या भेदभावाला सामोरे जावे लागले. त्याला व इतर अस्पृश्य मुलांना शाळेत वेगळे बसवले गेले. ते स्वत: पाणीही पिऊ शकत नव्हते. उच्चवर्णीय मुले उंचावरून हातावर पाणी ओतत असत.
३. डॉ. आंबेडकरांचे खरे नाव अंबावडेकर होते. हेच नाव त्याच्या वडिलांनी शाळेत ही नोंदवले होते. पण त्यांच्या एका शिक्षकाने हे नाव बदलून 'आंबेडकर' असं ठेवलं. अशा प्रकारे त्यांचे नाव आंबेडकर शाळेच्या नोंदीत नोंदवले गेले.
४. डॉ. आंबेडकरांचा विवाह १९०६ मध्ये रमाबाई या ९ वर्षांच्या मुलीशी झाला. त्यावेळी आंबेडकर केवळ १५ वर्षांचे होते. १९०७ मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर १९०८ मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयात प्रवेश घेणारे ते पहिले दलित विद्यार्थी होते. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली.
५. १९१३ मध्ये ते एमए करण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यावेळी त्यांचे वय अवघे २२ वर्षे होते. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मासिक शिष्यवृत्तीमुळे त्यांना अमेरिकेत शिक्षण घेणे शक्य झाले. १९२१ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएची पदवी मिळवली.
६. डॉ. आंबेडकरांनी दलितांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी 'बहिष्कृत भारत', 'मूक नायक', 'जनता' ही पाक्षिके आणि साप्ताहिक वृत्तपत्रे काढायला सुरुवात केली. १९२७ पासून त्यांनी अस्पृश्यता आणि जातीवादविरोधी चळवळ तीव्र केली. महाराष्ट्रातील रायगडमधील महाड येथे ही त्यांनी 'चवदार तळे' येथे सत्याग्रह सुरू केला. त्यांनी काही लोकांसमवेत 'मनुस्मृती'ची तत्कालीन प्रत जाळली. तर, १९३० मध्ये त्यांनी काळाराम मंदिर चळवळ सुरू केली.
७. १९३५ साली आंबेडकरांना मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य करण्यात आले. दोन वर्षे ते या पदावर होते.
८. आंबेडकरांनी १९३६ मध्ये मजूर पक्षाची स्थापना केली. त्यांची क्षमता पाहून त्यांना राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांना पहिले कायदेमंत्री बनवण्यात आले. आंबेडकरांनी १९५२ मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. ते दोन वेळा राज्यसभेचे खासदार होते.
९. हिंदू कोड बिलाचा मसुदा संसदेत रखडल्यानंतर आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या मसुद्यात उत्तराधिकार, विवाह आणि अर्थव्यवस्थेच्या कायद्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची मागणी करण्यात आली होती.
१०. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, अशोक विजयादशमीच्या दिनी डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. डॉ. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
संबंधित बातम्या