भाद्रपद शुद्ध षष्ठीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन, दुसऱ्या दिवशी सप्तमीला ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व अष्टमीला मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे ज्येष्ठागौरी असे म्हणतात.
बुधवार ११ सप्टेंबर रोजी, गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे पूजन केले जाईल. आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून सर्व देव स्त्रियांनी श्री महालक्ष्मीची आराधना केली. दैवी शक्ती प्रगट झाली व तिने राक्षसी वृत्तींचा नाश केला, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरीपूजनाचा सण साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली.
एकदा भगवान शिवशंकर पार्वतीला काळा रंग असल्यामुळे काली म्हणाले. पार्वतीला राग आला. पार्वती मातेने तप केले व तिचा रंग गोरा झाला. म्हणून या सणाला गौरी पूजनाचा सण म्हणू लागले. गणपती उत्सवात हा सण येत असल्यामुळे या सणाला गौरी गणपती असे म्हणतात. महालक्ष्मी ज्येष्ठा , पार्वती कनिष्ठा यांची एकत्र पूजा करण्याची पध्दत आहे. काही ठिकाणी गौरी या गणेशाच्या बहिणी असल्याचा उल्लेख आहे. गणपती बरोबर ज्येष्ठा व कनिष्ठा या त्याच्या बहिणींची पूजा करण्याची पध्दत आहे.
आपापल्या घराण्यांच्या पध्दतीप्रमाणे गौरी बसविल्या जातात. यात विविधता आहे. काही जण कुंभारवाड्यातून मुखवट्याला शोभतील असे दोन सुगडं आणून ते रंगवितात. त्यावर नाक, डोळे काढतात. काहींच्याकडे पितळेचे मुखवटे गौरी म्हणून बसवितात. काही ठिकाणी जिवतीप्रमाणे चित्राची पूजा करतात. काही ठिकाणी कुमारिकेकडून सुवासिक फुलांच्या वनस्पती आणतात व गौरी म्हणून पूजा करतात. कोकणात शेतकरी तेरड्याचे रोप आणतात ते सुपात लावून त्यावर मुखवटे ठेऊन त्याला साडी नेसवतात. काही लोक मडक्यांची उतरंड रचून किंवा डब्यावर डबे ठेवून त्यावर मुखवटे ठेवून गौरी उभ्या करतात. कोकणस्थ मंडळी नदीवरून पाच किंवा सात खडे आणून त्यांची पूजा करतात. गौरींचा आगमनानिमित्त घर सजविले जाते.
गौरीसमोर अनेक फराळाचे पदार्थ, गहू तांदुळाच्या राशी मांडतात. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. घरातील दोन सुवासिनी गौरींच्या मुलासहित दोन ताम्हणात मुखवटे घेऊन एकमेकीला हळदीकुंकू देऊन त्या मुखवट्यांची भेट घडवतात. मुखवटे हातात घेतलेली स्त्री, गौराई गौराई कुठं ग आलीस? असे म्हणते तेंव्हा दुसरी स्त्री ज्या स्थानावर गौराई आलेली असेल त्या स्थानाचा उच्चार करून, गौराई बैठकीच्या खोलीत, स्वयंपाक घरात, झोपण्याच्या खोलीत, ओसरीवर आली असे म्हणते. या तीन दिवसात गौरींच्या मध्ये गणपती ठेवला जातो.
नैवेद्यात १६ प्रकारच्या भाज्या असतात. १६ पुरणाचे दिवे करुन पूजा करतात. महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करतात. देवीचा महानैवेद्य अष्टमीला सकाळी प्रसाद म्हणून खातात. या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौऱ्यांचे विसर्जन केले जाते. गौरी पूजनाने दुःख नष्ट होते व लक्ष्मी स्थिर राहते अशी लोकश्रध्दा आहे. या सणाचं महत्व म्हणजे, अलक्ष्मीला घरातून घालवण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना केली जाते.