Mahabharat Story : रामायण आणि महाभारत हे भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. महाभारत आणि रामायणातून प्रत्येक भारतीय काही ना काही शिकत असतो, प्रेरणा घेत असतो. महाभारत हे तर शिकवणीचा खजिनाच आहे.
महाभारताची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. दुर्योधन अहंकारी आणि अधर्मी होता. त्याचा अहंकार आणि अधर्मी स्वभाव हे महाभारताच्या सर्वात मोठ्या युद्धासाठी कारण ठरला होता. महाभारताच्या युद्धामुळं कौरव वंशाचा नाश झाला. या युद्धात कौरव स्वत:च्या भावांच्या विरोधात गेले. या युद्धात दुर्योधनाचा शेवटचा मृत्यू झाला.
दुर्योधनाचा वध भीमाने केला. भीमानं दुर्योधनाच्या मांडीवर वार करून त्याचा वध केला. महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाची भूमिका महत्त्वाची होती. दुर्योधनानं मरताना आपली ३ बोटे श्रीकृष्णाला वारंवार दाखवली. दुर्योधनानं असं का केलं? यातून त्याला काय सांगायचं होतं? चला जाणून घेऊया…
दुर्योधनानं दाखवलेली तीन बोटं ही त्यानं केलेल्या तीन मोठ्या चुकांचं प्रतीक होती. त्या चुकांमुळंच कौरव महाभारताचं युद्ध हरले. तीन बोटं दाखवून ती भगवान श्रीकृष्णाला तेच सांगू पाहत होता. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
काय होत्या दुर्योधनाच्या त्या तीन चुका?
दुर्योधनाची पहिली चूक अशी होती की, त्यानं महाभारताच्या युद्धात त्यानं भगवान श्रीकृष्णाला स्वत:सोबत घेतलं नाही. श्रीकृष्ण की नारायणी सेना हे दोन पर्याय त्याला देण्यात आले होते. मात्र, त्यानं नारायणी सेना मागितली. दुर्योधन मरताना श्रीकृष्णाला म्हणाला, नारायणी सेनेऐवजी मी तुझी निवड केली असती तर आज मी या अवस्थेत नसतो. युद्ध जिंकले असते.
माता गांधारीचा पती म्हणजेच दुर्योधनाचे वडील धृतराष्ट्र अंध होते आणि माता गांधारीनं या कारणास्तव डोळ्यांवर पट्टी बांधून अंध म्हणून संपूर्ण आयुष्य घालवलं. युद्ध सुरू होण्याआधी गांधारीनं दुर्योधनाला नग्न अवस्थेत स्वत:समोर बोलावलं होतं. दुर्योधन नग्न अवस्थेत आईकडं जाऊ लागला तेव्हा श्रीकृष्णानं त्याला थांबवलं आणि सांगितलं की, या वयात नग्न होऊन आईकडं जाणं योग्य नाही. श्रीकृष्णानं झाडाच्या पानानं बनविलेला एक लंगोट घालून त्याला गांधारीकडं पाठवलं. दुर्योधन येताच गांधारीनं डोळ्यांवरील पट्टी उघडली. तिच्या डोळ्यांतून आलेल्या तेजामुळं दुर्योधनाचं शरीर वज्रासारखं झालं. फक्त जिथं पानांचा लंगोट होता, ती जागा वज्रहीन राहिली. त्याच ठिकाणी गदेचा प्रहार करून भीमानं दुर्योधनाचा वध केला. दुर्योधन श्रीकृष्णाला म्हणाला, जर मी नग्न होऊन निघून गेलो असतो, तर मला कोणीही मारू शकलं नसतं.
दुर्योधनानं श्रीकृष्णाला आपली तिसरी चूक सांगितली की, तो युद्धात लढण्यासाठी शेवटी आला होता. जर तो सुरुवातीपासून युद्ध लढत असता तर परिस्थिती वेगळी असती.
दुर्योधनाचं हे म्हणणं ऐकून श्रीकृष्णानं दुर्योधनाला त्याची खरी चूक सांगितली!
भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, या तीन चुका तुझ्या पराभवाचं कारण नाहीत. तुझा अधर्माला पाठिंबा आणि अहंकार हेच या युद्धातील तुझ्या पराभवाचं कारण आहे.