Ganesh Jayanti : माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महात्म्य
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganesh Jayanti : माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महात्म्य

Ganesh Jayanti : माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महात्म्य

Feb 08, 2024 11:23 PM IST

Maghi Ganesh Jayanti 2024 Date : गणेश जयंतीचा उत्साह सर्वांनाच असेल, जाणून घ्या माघ महिन्यातील गणेश जयंती कधी आहे? गणेश जयंती मुहूर्त, आणि ही गणेश जयंती कशी साजरी करतात.

Maghi Ganesh Jayanti 2024
Maghi Ganesh Jayanti 2024

गणेश जयंती म्हटली म्हणजे लाडक्या गणरायाचे आगत स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. विघ्नहर्ता प्रत्येकालाच संकटातून मुक्त करतो. विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला तर बाप्पाचे नामस्मरण व उपवास आपण करतोच. पण गणेशोत्सव म्हटले की सर्वांची उत्सुकता आणखी वाढते. १० तारखेपासून माघ मासारंभ होत आहे आणि यासोबतच माघी गणेश जयंतीही येत आहे. जाणून घ्या या तिथीबद्दल सविस्तर.

श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते.

भाद्रपद महिन्यात आपण गणेशोत्सव साजरा करतो. या वर्षी ७ सप्टेंबर २०२४ ला गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याआधी माघ महिन्यात महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो, त्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात. यंदा माघी गणेश जयंती १३ फेब्रुवारी २०२४ रोजी साजरी केली जात आहे.

माघ गणेश जयंती तिथी व मुहूर्त

या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी सुरु होणार असून, मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदयातिथीनुसार, १३ फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल.

गणेश पूजा मुहूर्त- यावर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त १३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११ वाजून ४० मिनिटापासून दुपारी १ वाजून ५८ मिनिटापर्यंत असणार आहे.

गणेश जयंती महत्व व गणेश अवतार

माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सवच साजरा केला जातो.

पौराणिक कथेनुसार, गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता. पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरा अवतार म्हणजे, माघ शुक्ल गणेश जयंती.

माघी गणेश जयंती पूजा

गणेशोत्सवात दीड दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधीवत पूजा करतात तशीच पूजा माघी गणेश जयंतीला काही भागात करतात. यादिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपल्यावर देवपूजा करावी, आणि चौरंगावर लाल वस्त्र टाकून विधिवत गणेशस्थापना करावी. गणेशाचा नामजप दिवसभर करा, गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी, गणेशाला लाल फुले आणि दूर्वा वाहावी. सायंकाळी श्री गणेश मंत्र व स्तोत्राचे पठण करावे. गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदक व लाडूचा प्रसाद करावा.

Whats_app_banner