Magh Month 2025 In Marathi : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष स्वतःचे महत्त्व असते. काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात माघ महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, स्नान, व्रत आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे या महिन्यात लोक गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वार, प्रयागराजसारख्या धार्मिक स्थळी जातात. धार्मिक दृष्टिकोनातून गंगेत स्नान करणारी व्यक्ती शरीर आणि आत्म्याने पवित्र बनते असा समज आहे. ३० जानेवारी २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा माघ महिना चालणार आहे.
हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्राच्या सान्निध्यात असतो म्हणून या मराठी महिन्याला माघ महिना असे म्हणतात. माघ हा मराठी वर्षाच्या कालगणनेनुसार अकराव्या क्रमांकाचा महिना आहे.धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. माघ महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा व उपासना केली जाते.
माघ महिन्याच्या प्रतिपदेपासून माघ गुप्त नवरात्र सुरू होते. माघ महिन्यात प्रथम पुजनीय गणेशाला स्मरण करून पहिला महत्वाचा सण येतो तो माघी गणेश जयंतीचा. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेला वरद विनायक या श्री.गणेशाच्या रूपाच्या जयंतीचा उत्सव या दिवशी साजरा केला जातो.या चतुर्थीला वरद चतुर्थी असे म्हटले जाते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. म्हणजे गणपती बाप्पाचा वाढदिवस. या दिवशी गणेश भक्तांना विनायकी चतुर्थीचा उपवास धरावयाचा असतो.
माघ आणि फाल्गुन हे दोन महिने शिशिर ऋतूचे असतात माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमी. वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. ब्रह्मदेवांनी जेव्हां सृष्टीची निर्मिती केली त्या वेळेला सरस्वती माता प्रकट झाली तो दिवस वसंत पंचमीचा होता. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो.
माघ महिन्यातला रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो व या रथाला सात घोडे असतात आणि म्हणून हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा करतात असे सांगतात.
माघ शुद्ध पौर्णिमेला गंगा स्नानाचे महत्व सांगितले आहे. नदी ही आपली जीवनदायिनी माता आहे असे आपली संस्कृती आपल्याला शिकविते , त्यामुळे नदीला आई मानून तिची पूजा,आरती करून नदीची ओटी पण काही ठिकाणी भरली जाते.
प्रत्येक महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यातल्या चतुर्दशीला शिवरात्र असतेच. वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रींमध्ये माघ महिन्यातल्या दुसऱ्या पंधरवड्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात आणि त्याला अध्यात्मिक महत्व आहे. समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल विष प्राशन करून भगवान महादेवांनी ब्रह्मांडाला वाचविले आणि सृष्टीचे रक्षण केले तो हा दिवस मोठ्या उत्साहाने महाशिवरात्र उत्सव म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे.
माघ महिन्यात जर कोणी तुमच्या घरी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. तसेच या महिन्यात तामसी आहार टाळावा. तसेच या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. हा महिना परोपकार कमावण्याचा महिना आहे. अशा वेळी साधकाने कठोर शब्द बोलणे टाळावे तसेच मोह, मत्सर, लोभ इत्यादी गोष्टींचा त्याग करावा.
संबंधित बातम्या