पवित्र श्रावण महिना आणि सोमवारचे व्रत हे शिवभक्तीमध्ये पार पडतो. महादेवाची आणि पार्वतीची पूजा करून श्रावण महिना साजरा करण्यात येतो. यंदा २ तारखेला श्रावण अमावस्या आणि शेवटचा सोमवार असा संयोग जुळून आला आहे.
पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याचीही परंपरा आहे. श्रावण महिन्यातील बैल पोळा हा शेवटचा सण मानला जातो. त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि पुन्हा सण-उत्सवाची रेलचेल सुरू राहते. हरतालिका, लाडक्या गणरायचं आगमन गणेश चतुर्थी ऋषीपंचमी आणि पितृपक्ष अशात हा महिनाही खास भक्तीभावात पार पडतो. परंतू शेवटचा श्रावण सोमवारीच अमावस्या आणि पोळा सणाचा योग आला असल्याने उपवास करायचा की नाही जाणून घ्या.
मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी २ सप्टेंबरला पहाटे ५ वाजून २१ मिनिटापासून ते ३ सप्टेंबरला सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदया तिथीनुसार २ सप्टेंबरला पिठोरी अमावस्या, पोळा, पाचवा श्रावण सोमवार असणार आहे.
पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते. त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते. शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी ३ सप्टेंबरला सकाळी संपणार असल्याने यादिवशी श्रावण सोमवारचा उपवास धरायचा आहे. पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग ७१ वर्षांनंतर जुळून आला आहे. २ सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवमूठ सातू असणार आहे.
श्रावण सोमवारी सकाळी उठून महादेव आणि पार्वतीचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी. यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करा. देवघर स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करा. आता भगवान शिवाला विधीवत अभिषेक करा आणि व्रताचा संकल्प घ्या. फुले, उदबत्ती, बेलाची पाने, अक्षदा आणि पाचवी शिवामूठ सातू इत्यादी वस्तू परमेश्वराला अर्पण करा. देशी तुपाचा दिवा लावा, आरती करा आणि शिव चालीसा पठण करा. तसेच महादेवाच्या मंत्रांचा जप फलदायी ठरतो.
पिठोरी अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह ६४ देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात. घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. तसेच अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी पितृ तर्पणही करण्याची परंपरा आहे.
सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उटणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं. घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना दिला जातो. ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त करतात. अनेक ठिकाणी अजूनही शेतकरी आपल्या बैलांना घेऊन गावभर फिरवतो आणि घरोघरी या बैलांची पूजा होते तसेच पुरणपोळीचा नैवेद्यही या बैलांना भरवला जातो.