हिंदू धर्मात कुंभ संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीप्रमाणे या दिवशी स्नान-ध्यान आणि दान केले जाते. संक्रांतीच्या दिवशी गंगास्नानाचेही विशेष महत्त्व आहे. कुंभ संक्रांती या दिवशी गंगा, यमुना किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि भक्ताला त्यांचा आशीर्वाद मिळतो.
दरम्यान, यावर्षी कुंभ संक्रांती मंगळवारी (१३ फेब्रुवारी) साजरी होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या विशेष दिवशी गंगा, यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. असे केल्याने अक्षय्य फळ आणि इष्ट देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी स्नान, दान आणि पूजा यांचे विशेष महत्त्व आहे.
हिंदू मान्यतेनुसार, सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. या दिवशी सूर्य मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करतो. त्यामुळेच या दिवशी स्नान, दान आणि सूर्य पूजनाचे विशेष महत्त्व आहे.
सूर्यदेव प्रसन्न झाल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, अशी मान्यता आहे. मकर संक्रांतीप्रमाणेच कुंभसंक्रांतीच्या दिवशी दान करण्याची फार जुनी परंपरा आहे.
असे मानले जाते की या सणाला काळे तीळ आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केल्यास सूर्यदेवासह शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
कुंभसंक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून पवित्र नदीत स्नान करावे. जे पवित्र नदीवर स्नानासाठी जाऊ शकत नाहीत त्यांनी स्नानाच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करा. सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि त्यांच्या मंत्रांचा भक्तिभावाने जप करा. गरीबांना मदत करा आणि त्यांना अन्न दान द्या.
यानंतर कुंभसंक्रांतीच्या दिवशी गायींना चारा जरूर खायला द्या. धार्मिक स्थळी दर्शनासाठी जा. तसेच, ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू दान करा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)