जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी भगवान विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. यंदा म्हणजेच. २०२४ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण सोमवारी (२६ ऑगस्ट) साजरा केला जाणार आहे. या दिवशी, कृष्ण भक्त उपवास करतात आणि भजन आणि कीर्तन करून आपल्या प्रिय देवाचे स्मरण करतात.
याशिवाय या दिवशी असे काही कार्य आहेत, जे केल्याने भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो, जसे की या दिवशी श्रीकृष्णाच्या काही आवडत्या वस्तू घरात आणल्यास ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो.
याशिवाय देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न राहते आणि तुमच्या घरात कधीही धन धान्य आणि पैशांची कमतरता भासत नाही.
जन्माष्टमीच्या दिवशी वैजयंती जपमाळ घरी आणून पूजा करा. ही जपमाळ भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्यास जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. असे मानले जाते की वैजयंती माळात माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी ही माळ घरी आणल्यास भगवान श्रीकृष्णासोबत लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. वैजयंती माला तुमच्या घरातील नकारात्मकता देखील दूर करते.
भगवान श्रीकृष्ण मोराचा मुकुट धारण करतात. त्यांना मोराचा मुकुट खूप आवडतो, म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही मोरपंख घरी आणावीत. असे मानले जाते की ज्या घरात मोराची पिसे असतात त्या घरात सकारात्मकता असते. मोराच्या पिसांच्या प्रभावामुळे राहू-केतू सारख्या ग्रहांचा अशुभ प्रभावही कमी होतो. तुम्हाला भीतीपासूनही मुक्ती मिळते.
जन्माष्टमीच्या दिवशी बासरी घरी आणून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास जीवनात यश मिळू लागते. घरात बासरी असणे देखील तुमचे मनोबल वाढवणारे मानले जाते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीला तुम्हीही बासरी घरी आणू शकता आणि लाभ मिळवू शकता.
भगवान श्रीकृष्णाला गाय खूप प्रिय आहे आणि हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी गाय आणि वासरू यांची मूर्ती घरी आणून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास कौटुंबिक सुखाची प्राप्ती होते.
असे मानले जाते की गाय आणि वासरू घरी आणणे मुलाच्या सुरक्षिततेसाठी किंवा मुलाच्या आनंदासाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय घरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्याने वास्तू दोष दूर होतो.
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणावा. या शंखात पाणी आणि दूध टाकून भगवान श्रीकृष्णालाही अभिषेक करावा. घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असल्यास कुटुंबात सुख-समृद्धी नांदते, असा विश्वास आहे.
घरात शंख असल्यामुळे वैवाहिक जीवनही आनंदी राहते. यासोबतच हा उपाय तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठीही प्रभावी ठरतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)