वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना सुरू झाला असून, आज २ डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू झाला आहे. या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देव दीपावलीचा असतो. या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करण्याची परंपरा आहे. यादिवसापासून खंडोबाचे नवरात्र सुरू होते.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. या वर्षी ६ तारखेला नागदिवे पूजन होणार असून, ७ डिसेंबर २०२४ ला चंपाषष्ठी आहे.
‘खंडोबाचे नवरात्र’ हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रात्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती अर्पण केली जातात.
चंपाषष्टी षडरात्र हा श्री खंडोबाचा प्रमुख उत्सव मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदेस देवाची घट स्थापना होते व षष्टीस या उत्सवाची सांगता होते, खंडोबा कुलदैवत असणाऱ्या सर्वच घरांमध्ये हि घट स्थापना केली जाते, प्रतिपदेस घट स्थापना करून सहा दिवस हा उत्सव चालतो कुटुंब प्रमुख उत्सवात उपवास धरतात, रोज घटावर फुलांची माळ सोडली जाते, चंपाषष्टीस घटाचे उद्यापन करून कुलधर्म कुलाचार केले जातात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड होय. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.