Kartiki Ekadashi: आज कार्तिकी एकादशी. आज पांडुरंगाच्या भेटीचा दिवस, त्याचे मनोभावे पूजन करण्याचा दिवस. भक्तांचा लाडका असलेल्या अशा या पांडुरंगाच्या आरत्याही भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्या मनोभावे गायल्या जात असतात. या आरत्यांपैकीच एक आरती म्हणजे 'येई वो विठ्ठले माझे माऊली ये' ही आरती
येई वो विठ्ठले माझे माऊली ये हा अंभंग कवी विष्णुदास नामा यांनी लिहिला. हाच अभंग आरती स्वरुपात सुमारे ५०० वर्षे महाराष्ट्रात अखंडपणे गायला जात आहे. गणेशोत्सवात देखील ही आरती श्रीगणेशापुढे म्हटली जात असते.
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥
या आरतीचा भावार्थ-
हे माझ्या विठाई माऊली, मी कपाळावर हात धरून तुझी अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. कोणी येणारा-जाणारा दिसला रे दिसला की मी त्याच्याकडे तुझ्यासाठी निरोप पाठवत आहे. माझा मायबाप विठ्ठल पंढरपुरात राहतो. मी आर्त मारलेली हाक ऐकून जणूकाही माझा विठोबा येत आहे. गरुडावर बसून माझा कैवारी माझ्याकडे येत आहे. याचा मोठा आनंद झाला आहे. विठोबाचे राज्य म्हणजे आमच्यासाठी रोजचीच दिवाळी आहे. विष्णुदास नामा अशा माझ्या विठ्ठलाला जीवे भावे ओवाळत आहे.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा या अभंगाची रचना संत नामदेव महाराज यांनी केली. ती आरती अशी-
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।। धृ० ।।
पंढरीचा पांडुंरंग गेली अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे. म्हणजेच ही सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासूनच तो विटेवर उभा आहे. त्याच्या डाव्या बाजूला रखुमाई दिसत आहे आण तिचे रूप दिव्य आहे. परब्रह्म म्हणजे विठ्ठल. विठ्ठल आपला प्रिय भक्त पुंडलिक याच्या भेटीला आले. अशा विठ्ठलाच्या चरणी भीमा नदी, अर्थात चंद्रभागा नदी वाहत आहे आणि ती जगाचा उद्धार करत आहे. अशा या पांडुरंगाचा जयजयकार आहे. रखुमाईवल्लभ म्हणजे रुक्मिणीचा पती, स्वामी, तिला प्रिय असलेला. राईच्या वल्लभा म्हणजे राहीचा वल्लभ. राही म्हणजे राधा आणि वल्लभ म्हणजे श्रीकृष्ण -
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
भावार्थ-
पांडुरंगाच्या गळ्यात तुळशीमाळ आहे आणि त्याचे हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याने कमरेला पिवळ्या रंगाचे सोवळ्याचे वस्त्र नेसले आहे. तसेच कपाळावर कस्तुरीचा टिळा लावला आहे. अशा या विठ्ठलाच्या भेटीसाठी देव, श्रेष्ठ देवदेवता नेहमीच येत असतात. गरुड आणि हनुमान नेहमी त्यांच्यापुढे हात जोडून उभे असतात. गरुड हे विष्णूचे वाहन आहे आणि हनुमान हा रामाचा दास आहे. म्हणजेच विठ्ठल हा विष्णूचा अवतार आहे, असा अर्थ येथे सूचित आहे.
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
भावार्थ
वेणु म्हणजे बासरी. याचा संबंध श्रीकृष्णाशी आहे. म्हणजेच विठ्ठल हा श्रीकृष्णच आहे. पांडुरंग हा पंढरीचा राजा आहे. तो रक्षणकर्ता आहे म्हणून त्याला अनुक्षेत्तरपाळ म्हटलेले आहे. अशा या वनमाळी असलेल्या पांडुरंगाच्या गळ्यात सोन्याची कमळे आहेत. सावळ्या विठोबाला त्याची राणी राही म्हणजे राधा असलेली रखुमाबाई ओवाळते.
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
भावार्थ-
कुर्वंड्या म्हणजे द्रोणातील दिवे. पांडुरंगाला आरत्या ओवाळण्यासाठी द्रोणातील दिवे येतात आणि चंद्रभागेत सोडून दिले जातात. येथे दिंड्या आणि पताका घेऊन वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त नाचतात. असा या पंढरीचा महिमा आहे.
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।
भावार्थ
आषाढी आणि कार्तिकीला पांडुरंगाचे भक्त पंढरीत दाखल होतात. तेथे चंद्रभागेत ते स्नान करतात. दर्शनहेळामात्र म्हणजेच क्षणभराच्या दर्शनाने त्यांना मुक्ती मिळते. केशव हे विष्णूचे, श्रीकृष्णाचे नाव आहे. नामदेव केशवाला भक्तीभावाने ओवाळतात.