देवउठनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायक मानले जाते. देवउठनी एकादशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष तिथीला साजरी केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्री हरि विष्णू योगझोपेतून उठतात. यावर्षी देवउठनी एकादशी १२ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर कथेचे पठण केल्याशिवाय एकादशीचे व्रत अपूर्ण मानले जाते. देवउठनी एकादशी व्रतकथेचे पूर्ण भक्तीभावाने पठण केल्याने व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते.
देवउठनी एकादशी व्रत कथा
एका राज्यातील सर्व लोक देवउठनी एकादशीला उपवास करत असत. एकादशीच्या दिवशी लोकं, चाकरमान्यांपासून जनावरांपर्यंत सर्वांना अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज! कृपया मला कामावर घ्या. तेव्हा राजाने त्याच्यासमोर एक अट ठेवली कामाला ठेवायला हरकत नाही, परंतू रोज तुम्हाला खायला सर्व काही मिळेल, पण एकादशीला तुम्हाला जेवण मिळणार नाही. त्या वेळी तो माणूस 'हो' म्हणाला, पण एकादशीच्या दिवशी जेव्हा त्याला फक्त फळं देण्यात आले, तेव्हा तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला - महाराज! यामुळे माझं पोट भरणार नाही. मी उपाशी मरून जाईन. मला जेवण द्या.
राजाने त्याला त्या अटीची आठवण करून दिली, पण तो अन्न सोडायला तयार झाला नाही, तेव्हा राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ वगैरे दिले. तो नेहमीप्रमाणे नदीवर पोहोचला, आंघोळ करून स्वयंपाक करू लागला. जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला - चला प्रभू! जेवण तयार आहे. त्याच्या हाकेला पितांबर धारण केलेले भगवंत चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्यांच्याबरोबर भोजन करू लागले. जेवल्यानंतर देव अदृश्य झाला आणि तो आपल्या कामाला गेला.
१५ दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला सांगू लागला की, महाराज मला दुप्पट अन्न द्यावे. राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की, देवही माझ्याबरोबर जेवतो. त्यामुळे आम्हा दोघांसाठी हे अन्न पूर्ण होत नाही. हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "देव तुझ्याबरोबर जेवतो यावर माझा विश्वास बसत नाही." मी खूप उपवास करतो, पूजा करतो, पण देवाने मला कधीच दर्शन दिले नाही.
राजाचे बोलणे ऐकून तो म्हणाला, "महाराज, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर आपण माझ्याबरोबर येऊन बघा." राजा एका झाडामागे लपला. तो माणूस जेवण बनवून संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारत राहिला, पण देव आले नाही. शेवटी तो म्हणाला- अरे देवा! तू आला नाहीस तर मी नदीत उडी मारून मरून जाईन.
देव आले नाही, मग तो जीव द्यायला नदीच्या दिशेने निघाला. प्राण सोडण्याचा त्याचा निर्धार लक्षात येताच लवकरच देव प्रकट झाले आणि त्याला थांबवून त्याच्याबरोबर जेवायला बसले. खाऊन-पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाला वाटले की, मन शुद्ध झाल्याशिवाय उपवासाचा काहीच फायदा होणार नाही. यामुळे राजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यांनीही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्ग प्राप्त केले.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.