Kamika Ekadashi 2023 : अजाणतेपणी केल्या गेलेल्या पापांपासून मुक्ती देतं कामिका एकादशीचं व्रत
Importance Of Kamika Ekadashi : आषाढ आणि श्रावण महिन्याला जोडणारा दुवा म्हणून या एकादशीला पाहीलं जातं. ही एकादशी अत्यंत महत्वपूर्ण एकादशी मानली जाते.
आषाढ महिन्यातल्या कृष्ण एकादशीला कामिका एकादशीचं व्रत साजरं केलं जाणार आहे. आषाढ आणि श्रावण महिन्याला जोडणारा दुवा म्हणून या एकादशीला पाहीलं जातं. ही एकादशी अत्यंत महत्वपूर्ण एकादशी मानली जाते.
ट्रेंडिंग न्यूज
कामिका एकादशीची तारीख आणि वेळ कोणती?
आषाढ कृष्ण कामिका एकादशी तिथी १२ जुलै संध्याकाळी ०६. २४ वाजता सुरू होईल. आषाढ कृष्ण कामिका एकादशी तिथी १३ जुलै रोजी संध्याकाळी ०६.२४ वाजता समाप्त होईल.
कामिका एकादशीचं महत्व काय?
कामिका एकादशी चातुर्मासात येत असल्यामुळे या व्रताचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. शिवभक्तांसाठीही ही एकादशी विशेष असते याचं कारण म्हणजे ही एकादशी आषाढ आणि श्रावणाचा संगम करणारी एकादशी आहे. आषाढ संपत आल्याची ही वर्दी आहे आणि श्रावण सुरू होणार असल्याची ही नांदी आहे. या व्रताचे पालन केल्याने जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. कामिका एकादशीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते. कामिका एकादशीला भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
कामिका एकादशाच्या दिवशी काय करावं?
कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि त्यानंतर देवघरात थोडे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं आणि देवघर पवित्र करावं. त्यानंतर लाकडी चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं. मूर्तीला पंचामृत, फळे, मेवा आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर नियमानुसार पूजा करून कथा वाचन करून आरती करावी. पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीचा आवर्जुन समावेश करावा. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. मात्र आपल्या हातून या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत किंवा तुळशीला पाणी घालू नये. असं केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होण्याची शक्यता असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)