येत्या २२ जून २०२४ रोजी संत कबीरदास यांची जयंती साजरी केली जात आहे. कबीरदास हे एक संत आणि कवी असण्यासोबतच विचारवंत आणि समाजसुधारकही होते. समाजात पसरलेल्या गैरसमजांवर आणि अंधश्रद्धांवर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला होता. आपल्या दोह्यांमधून आयुष्य जगण्याचे अनेक धडे त्यांनी समाजाला दिले आहेत. त्यामुळेच शालेय आणि उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. कवी कबीरदास एक अत्यंत हुशार आणि धाडसी कवी होते. आपल्याला न पटणारे विचार त्यांनी अगदी स्पष्ट आणि ठळकपणे आपल्या लेखणीतून मांडले आहेत.
विशेष म्हणजे कवी कबीरदास यांच्या कविता अर्थातच दोहे हे अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत मांडण्यात आले आहेत. त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीला समजण्यास आणि उमजण्यास फारसे कठीण नव्हते. या कविता आजही लोकांना आयुष्यात योग्य दिशा दाखवण्यास उपयोगी पडतात. कित्येक लोक आजही अगदी रस घेऊन या दोह्यांचे वाचन करत असतात. आजही समजावर कवी कबीरदास यांच्या विचारांचा व्यापक प्रभाव दिसून येतो.
कवी कबीर यांचे खाजगी आयुष्य रहस्यमयी असल्याचे नेहमीच म्हटले जाते. कवींच्या आयुष्याबाबत अनेक वादविवाद पाहायला मिळतात. त्यांच्या जन्माबाबत विविध तज्ञांनी विविध अंदाज सांगितले आहेत. त्यामुळे त्यांचा जन्म नेमका कुठे आणि कोणत्या कुटुंबात झाला हे ठामपणे आजही कोणीच सांगू शकत नाही. काही तज्ञांच्या मते कवी कबीरदास यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. मात्र गुरु रामानंद यांच्या शिक्षेतून त्यांना रामनामाचे संस्कार मिळाले होते. तर आणखी काहींच्या मते कबीरदास यांनी गुरु रामानंद यांच्या आशीर्वादाने एक विधवा ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्म घेतला होता. मात्र त्या स्त्रीने समाजाच्या भीतीने आणि लाजेने त्यांना काशीतील एका तलावाजवळ सोडून दिले होते. त्यानंतर लेई आणि लोईमा या विणकरांनी त्यांचे संगोपन करत त्यांना वाढवले होते.
''माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर,
कर का मनका डार दे, मन का मनका फेर।''
या दोह्याचा अर्थ आहे, एखादी व्यक्ती आपल्या हातात मोत्याची माळ बराच वेळ फिरवत असते. परंतु त्याने त्यांचा स्वभाव बदलत नाही. त्यांच्या मनातील कुविचार आणि गोंधळ शांत होत नाही. अशा व्यक्तीला कबीरांनी सल्ला देत म्हटले आहे की, हातात असलेली जपमाळ फिरवणे थांबवा आणि मनातील मणी बदला किंवा फिरवा. म्हणजे मनातील कुविचार आणि द्वेष काढून टाका.
''तन को जोगी सब करें, मन को बिरला कोई
सब सिद्धि सहजे पाइए, जे मन जोगी होइ।''
या दोह्याचा अर्थ आहे की, साधू संतांप्रमाणे अंगावर भगवे कपडे परिधान करणे अगदी सोपे असते. पण मनाला योगी बनवणे हे फार कमी लोकांना शक्य होते. जर खऱ्या अर्थाने मन योगी झाले तर सर्व सिद्धी सहज प्राप्त होतात.