संपूर्ण जगाचं लक्ष ज्या रथयात्रेकडे लागलेलं असतं त्या पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेची तारीख जाहीर झाली आहे. यंदा भक्तांना दर्शन दयायला जून महिन्याच्या मध्यातच भगवान जगन्नाथ देवळातनं बाहेर पडणार आहेत.
हिंदू धर्मात यात्रांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. त्यात भगवान जगन्नाथ यात्रेच्या दिवसाची लोकं आतुरतेने वाट पाहात असतात. असं म्हणतात की, देवाचा हा रथ ओढायला पुण्याचं काम मानलं जातं.
पुरीच्या जगन्नाथाचा रथ ४५ फूट उंच असून या रथाचे नाव नंदीघोष असं आहे. नंदीघोष (भगवान जगन्नाथासाठी), तलध्वज (बलभद्रासाठी) आणि दर्पदालन (सुभद्रेसाठी) म्हणून ओळखले जाणारे हे रथ सुंदरपणे सजवलेले आहेत.
ही रथयात्रा सुमारे ३ किमी अंतर कापते आणि ते अंतर कापायला या रथयात्रेला संपूर्ण दिवस लागतो. ही रथयात्रा गुंडीच्या मंदिरात संपते आणि भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा तिथे ९ दिवस राहतात.
यंदा या रथयात्रेची तारीख जाहीर झाली असून २० जून २०२३ रोजी रात्री १० वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल आणि २१ जून २०२३ रोजी संध्याकाळी ०८ वाजून ०९ मिनिटांनी संपणार आहे. ही रथयात्रा पाहायला देशविदेशातून परदेशी पर्यटक आवर्जुन गर्दी करतात.
भगवान जगन्नाथ हे श्री हरी विष्णूच्या मुख्य अवतारांपैकी एक आहेत. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेसाठी रथ बांधण्याचे काम अक्षय्य तृतीयेपासून सुरू होते.
हे रथ बनवण्यासाठी सुमारे दोन महिने लागतात. दरवर्षी वसंत पंचमीपासून दशपल्लाच्या जंगलात लाकूड गोळा करण्याचे काम सुरू होते. हे रथ फक्त श्री जगन्नाथ मंदिराचे सुतार बनवतात. त्यांना भोई सेवातगण असं म्हणतात.
हे तीन रथ तयार करण्यासाठी २०० हून अधिक सुतार एकत्र काम करतात. दरवर्षी रथयात्रेसाठी नवीन रथ बनवले जातात आणि जुने रथ फोडले जातात.
संबंधित बातम्या