आपल्या देशामध्ये विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. प्रत्येक धर्मानुसार विविध चालीरीती आणि परंपरा पाहायला मिळतात. प्रत्येकालाच आपल्या धर्माबद्दल आदर आणि प्रेम असते. तर अनेकांना विविध धर्माबाबत जाणून घेण्याचे कुतूहल असते. प्रत्येक धर्मात काही ना काही महत्व आणि रहस्ये असतात. यातीलच एक धर्म म्हणजे इस्लाम होय. इस्लाम धर्मामध्ये विविध रिती-परंपरा पाहायला मिळतात. या धर्मात प्रत्येक गोष्टीमागे एक महत्व असते.
इस्लाम धर्मात हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. आपल्या आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी भेट द्यावी अशी मुस्लिम बांधवांची इच्छा असते. अनेक लोक आयुष्यभराची मिळकत ठेऊन या पवित्र ठिकाणी जाऊन मनोभावाने आपल्या धर्माची प्रार्थना करतात. मात्र बहुतांश लोकांना हज आणि उमराह या दोन वेगवेगळ्या यात्रा असतात हे माहिती नाही. या दोन्ही पवित्र यात्रांमध्ये नेमका फरक काय असतो? आणि या यात्रांचे नियम काय असतात? हे आपण आज जाणून घेणार आहोत.
हज यात्रा ही मुस्लिम लोकांसाठी अत्यंत महत्वाची यात्रा आहे. इस्लाम धर्मात या पवित्र यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. सौदी अरेबियातील वार्षिक मक्का-मदिना यात्रा म्हणजे हज होय. इस्लाम धर्मातील प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे फर्ज(कर्तव्य)आहे. जी व्यक्ती शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे अशा लोकांना हज करणे बंधनकारक मानले जाते. हज यात्रा तब्बल ४० दिवसांची असते. या ४० दिवसात लोक सुखसोयीचे मोहाचे जगणे सोडून अल्लाहची मनोभावाने भक्ती करतात.
इस्लाम धर्मातील मक्केच्या पवित्र तीर्थयात्रेला उमराह म्हटले जाते. उमराह ही एक ऐच्छिक यात्रा असते. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने उमराह केलेच पाहिजे असे बंधन नसते. ही यात्रा १५ दिवसांची असते. या यात्रेत लोक आपला अल्लाहवरील विश्वास मजबूत करण्याचा आणि आपल्या पापांचे प्रायश्चित करण्याचा प्रयत्न करतात. या यात्रेत 'काबा'च्या भोवती फेऱ्या माराव्या लागतात. ज्या लोकांची ही प्रदक्षिणा पूर्ण होते, त्या लोकांची उमराह यात्रा मंजूर झाली किंवा यशस्वी झाली असे समजले जाते.
इस्लाम धर्मानुसार सांगायचे तर हज यात्रा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी बंधनकारक असते. शारीरिक-आर्थिकदृष्ट्या सशक्त लोकांना आयुष्यात एक वेळ तरी ही यात्रा करणे अनिवार्य असते. मात्र उमराह यात्रा ऐच्छिक असते. प्रत्येक व्यक्तीने ही यात्रा करायलाच हवी असे बंधन नसते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हज यात्रा तब्बल ४० दिवसांची असते तर उमराह यात्रा १५ दिवसांची असते. उमराह वर्षभरात कधीही केले तरी मान्य असते. मात्र हज इस्लामिक कॅलेंडरनुसार एका ठराविक काळातच करण्याची प्रथा आहे.
मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीकडे खरंच वेळ नसेल तर तो व्यक्ती २ तासातसुद्धा उमराह पूर्ण करू शकतो. मात्र हज यात्रेच्या बाबतीत असे नसते. हज यात्रेसाठी ४० दिवसांचा ठराविक काळ आवर्जून देणे गरजेचे असते. मात्र या दोन्ही यात्रांमध्ये मुस्लिम बांधव जगातील सुखसुविधा ऐषाराम सोडून आपल्या पापांचे प्रायश्चित करत असतात. आणि अगदी मनापासून नमाज, कुराण पठण करत अल्लाहची प्रार्थना करतात.