Indira Ekadashi 2024 : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. एकादशीचे व्रत पुण्य फळ प्राप्तीसाठी फार महत्वाचे मानले जाते. सध्या पितृ पक्ष सुरू आहे. पितृपक्षातील एकादशीचे महत्व आणि नियम जाणून घ्या.
इंदिरा एकादशीचे व्रत वर्षातून एकदा पाळले जाते. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. यंदा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूचे भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक पूजा करतात. एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्रताचे काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया पितृ पक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात-
पंचांगानुसार, उदया तिथीमुळे २८ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. एकादशी तिथी २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल, जी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४९ मिनिटांनी समाप्त होईल.
इंदिरा एकादशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा करावी. जर तुम्ही या दिवशी उपवास करत नसाल तर सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. व्रत पाळण्याआधी व्रत पाळण्याचा संकल्प नक्की करा. उपवासाचे सर्व नियम पाळा. सूर्योदयानंतर पारण करणे उत्तम आहे. या दिवशी भजन-कीर्तनही करावे.
इंदिरा एकादशीच्या दिवशी मद्यपान करू नये. या दिवशी तामसिक अन्न सेवन केल्याने भगवान विष्णू क्रोधीत होऊ शकतात.
इंदिरा एकादशीच्या दिवशी तांदूळ खाण्यास मनाई आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ल्याने पाप लागते, असे मानले जाते.
तुळशीची पाने भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहेत, नैवेद्यात तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवंताला अर्पण केले जात नाही. त्यामुळे इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना हात लावू नये आणि तोडू नये. मान्यतेनुसार या दिवशी तुळशीही उपवास करते. त्यामुळे त्यांना स्पर्श करणे टाळावे. नैवेद्यात टाकण्यासाठीही तुळस आदल्या दिवशी तोडून ठेवावे.
धार्मिक मान्यतेनुसार इंदिरा एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. भगवान विष्णूचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ राहील.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.