Indira Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. द्वादशी तिथीला भगवान विष्णूची पूजा करून व्रत सोडले जाते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशी म्हणतात. इंदिरा एकादशीचे व्रत देखील पितरांसाठी विशेष मानले जाते.
असे मानले जाते की, जे लोक आपल्या पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान करतात, त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि या दिवशी पितरांच्या नावाने दानधर्मही केला जातो. इंदिरा एकादशीची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया…
पंचांगानुसार, एकादशी तिथी २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४९ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदयातिथीनुसार २८ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
इंदिरा एकादशीच्या दिवशी रात्री ११ वाजून ५१ मिनिटापर्यंत सिद्ध योग तयार होत आहे. पूजेसाठी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४२ मिनिटे ते ९ वाजून १२ मिनिटापर्यंत शुभ चौघडिया आहे. सायंकाळी ३ वाजून ११ मिनिटे ते ४ वाजून ४० मिनिचापर्यंत अमृत चौघडिया आहे.
द्वादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रताला पारणाचा शुभ मुहूर्त २९ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वाजून १३ मिनिटे ते ८ वाजून ३६ मिनिटापर्यंत आहे. द्वादशी तिथी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून ४७ मिनिटांनी समाप्त होईल.
पितृ पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षांची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह अनेक शुभ फळ मिळतात. इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पित्र तृप्त होतात आणि भगवान विष्णूची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते.
पद्म पुराणात वर्णन केलेल्या पद्धतीनुसार इंदिरा एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला पितरांचे श्राद्ध करावे.
दशमी तिथीला ब्राह्मण, गाय, कावळे आणि कुत्र्यांना अन्नदान करा. तसेच या दिवशी कोणाशीही अपशब्द वापरून बोलू नका.
दशमी तिथीला रात्री जमिनीवर झोपावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी तिथीला व्रत करण्याचा संकल्प करावा.
यानंतर स्नान वगैरे झाल्यावर एका चौरंगावर पिवळे कापड पसरून त्यावर श्री विष्णूची प्रतिष्ठापना करावी.
त्यानंतर भगवान विष्णूला आणि त्यांच्यासोबत देवी लक्ष्मीला संपूर्ण पूजा अर्पण करा. त्यांना नैवेद्य अर्पण करा.
इंदिरा एकादशीची कथा वाचा किंवा ऐका आणि नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा.