नृसिंह जयंती वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाणार आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर नृसिह जयंती ०४ मे २०२३ रोजी साजरी केली जाईल. विष्णूचा चौैथा अवतार म्हणून नृसिहाकडे पाहिलं जातं. भगवान विष्णूचा अत्यंत भयानक अवतार म्हणूनही याकडे पाहिलं जातं. राजा हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णूने घेतलेल्या या अवताराला नमस्कार करण्याचा हा दिवस आहे. नृसिंह जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
नृसिंह जयंती हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय किंवा असत्यावर सत्याचा विजय या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे. त्यासाठी आपल्याला राजा हिरण्यकश्यपू, भक्त प्रल्हाद आणि विष्णूंचा नृसिंह अवतार याची कहाणी वाचावी लागेल.
राजा हिरण्यकश्यपू अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याने घोर तपश्चर्या करून ब्रम्हदेवांना खुष केलं होतं. त्याची तपश्चर्या पाहून ब्रम्हदेवांनी त्याला वरदान मागायला सांगितले. तेव्हा हिरण्यकश्यपूने माणूस किंवा प्राणी त्याला मारू शकत नाही, तो घराच्या आत किंवा घराबाहेर मरू शकत नाही, त्याला दिवसा किंवा रात्री मारता येऊ शकणार नाही, असं वरदान ब्रम्हदेवांकडून मागितलं.
ब्रम्हदेवांनी त्याला हे वरदान दिल्यावर हिरण्यकश्यपू स्वत:ला देव समजू लागला आणि प्रजेवर अनंत अन्याय करू लागला. मात्र हिरण्यकश्यपूला एक मुलगा होता, ज्याचं नाव प्रल्हाद होतं. प्रल्हाद काही केल्या विष्णूचं स्मरण करणं सोडत नव्हता.
हे पाहून हिरण्यकश्यपू संतापला आणि त्याने आपली बहीण होलिकेला भक्त प्रल्हादासोबत अग्नीत बसण्यास सांगितले. होलिकेला अग्नीचं वरदान असल्याने ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली मात्र प्रल्हादाच्या मुखी विष्णूनाम असल्याने तो अग्नीतून वाचला आणि होलिका मरण पावली.
आपल्या बहिणीच्या वियोगाने हिरण्यकश्यपू वैतागला आणि त्याने प्रल्हादाला विष्णू कुठाय असं विचारलं. या चराचरात विष्णू आहे असं प्रल्हाद म्हणाला.
या महालातल्या खांबातही विष्णू आहे का असा प्रश्न हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला केला. त्यावर प्रल्हाद हो म्हणताच, हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारली.
खांबाला लाथ मारताच त्यातून अक्राळ विक्राळ नृसिंह प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला.
म्हणून या दिवसाला नृसिंह जयंती असं ओळखलं जातं. यादिवशी व्रत केल्यास सारी पापं धुवून निघतात असं सांगितलं जातं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)