हिंदू धर्मात मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा करावी असं सांगितलं आहे. हनुमान शक्तीची देवता आहेच. मात्र हनुमानाकडे बुद्धीचातुर्यही पाहायला मिळतं. भक्तीची परिसीमा म्हणजे हनुमान आणि शनि किंवा राहू केतूची पीडा जर संपवायची असेल तरीही हनुमानाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही.
बरेचसे लोक दर शनिवारी देवळात जाऊन मारुतीची पूजा करतात. पूजा करताना नेहमी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र म्हणताना आपण पाहातो. मात्र हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र किती वेळा म्हणावं याची तुम्हाला माहिती आहे का?.
हनुमान चालिसामध्ये 'छूटहि बंदि महा सुख होई'। असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. याचा थेट अर्थ असा होतो की, हनुमान चालिसाचे शंभर वेळा पठण केल्याने माणसाला प्रत्येक बंधनातून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार हनुमान चालिसाचं शंभर वेळा पठण करावे. मात्र काही कारणास्तव तुम्हाला हनुमान चालिसा शंभर वेळा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही त्याचं पठण किमान ७, ११ किंवा २१ वेळा करा.
ज्योतिष शास्त्रानुसार बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा. त्यासाठी सकाळी शुचिर्भुत व्हा. शास्त्रानुसार हनुमान चालिसाचे पठण जमिनीवर काहीतरी अंथरून त्या आसनावर बसून करावे. आसन न ठेवता पूजा करणे अशुभ मानले जाते. पाठ सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करावी आणि भगवान श्रीरामाची पूजा मनोभावे करावी. यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे.
जर तुम्हाला मारूतीला प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पाठ करा. सकाळी हनुमान चालिसा पाठ करणार असाल तर सकाळी आंघोळ करून तुम्ही हनुमान चालिसा पाठ करू शकता. संध्याकाळी तुम्हाला हनुमान चालिसा पाठ करायचा असल्यास तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून शुद्ध अंत:करणाने पाठ करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)