सनातन धर्मात होळी (Holi 2024) सणाला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या ८ दिवस आधी होळाष्टक (Holashtak 2024) सुरू होते. यंदा होलिका दहन (Holika Dahan) २४ मार्च रोजी रविवारी आहे. अशा परिस्थितीत आज रविवारापासून (१७ मार्च) होळाष्टक सुरू झाले आहे.
होळाष्टकाच्या वेळी केलेल्या शुभ कार्याचे शुभ फळ मिळत नाही आणि जीवनात अशुभ परिणाम होतात, अशी धार्मिक धारणा आहे. यामुळे या काळात शुभ कामं केली जात नाहीत.
धार्मिक मान्यतेनुसार होळाष्टकाच्या दिवशी भगवान शंकराने कामदेवाला भस्म केले होते. या काळात दररोज वेगवेगळे ग्रह उग्र रूपात असतात, त्यामुळे होलाष्टकात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
तसेच, होळाष्टकच्या या ८ दिवसात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत, याबाबत पौराणिक कथादेखील आहेत. त्याच कथा आपण येथे जाणून घेणार आहोत.
हिंदू पौराणिक कथेनुसार, राक्षस राजा हिरण्यकश्यपने त्याचा मुलगा, विष्णूचा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी निश्चित केली होती. याच्या ८ दिवस आधी हिरण्यकश्यप राक्षसाने प्रल्हादचा छळ सुरू केला होता. प्रल्हादने विष्णूची भक्ती सोडून राक्षसांची भक्ती करावी, अशी त्याची इच्छा होती. पण भक्त प्रल्हादाने छळ सहन केला आणि भगवान विष्णूची भक्ती सोडली नाही. शेवटी होलिका दहनाच्या दिवशी भक्त प्रल्हाद वाचतो. याच आनंदात होळीचा सण साजरा केला जातो.
होलाष्टकात दानधर्माचे शुभ कार्य करता येते. तसेच, यावेळी तुम्ही अन्नदान करू शकता. होलाष्टकात तुम्ही ब्राह्मणांना भोजन देऊ शकता. तुम्ही नियमित क्रियाकलाप देखील करू शकता. मुळात, तुम्ही ग्रहांच्या शांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या