September 2023 Hindu Festival List : ऑगस्ट महिना संपत असताना राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपुरसह राज्यातील बहुतांश शहरांमध्ये सप्टेंबर महिन्यात येऊ घातलेल्या सणांच्या नियोजनाची तयारी सुरू आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात ही कजली तीज या सणापासून होणार आहे. त्यानंतर जन्माष्टमी, हरतालिका बीज, पितृ पक्ष आणि त्यानंतर कलंक चतुर्थी साजरी केली जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात एकमागून एक सण आल्याने बँकांना तब्बल सोळा दिवस सुट्टी राहणार आहे. त्यामुळं अनेकांनी येणाऱ्या महिन्यात सणासुदीची तयारी केलेली आहे. आगामी महिन्यात कोणत्या सणाचं काय महत्त्व असेल?, हे जाणून घेऊयात.
हिंदू समाजात जन्माष्टमीला प्रचंड महत्त्व आहे. भगवान कृष्ण यांच्या जन्मदिवशी हा सण साजरा करण्यात येत असतो. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे सहा सप्टेंबरला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळं अनेकांनी जन्माष्टमीसाठी कुटुंबियांसोबत वेळ घालवत जन्माष्टमी साजरी करण्याची प्लँनिंग केलेली आहे.
भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षाच्या द्वादशीला हिंदू धर्मात वत्स द्वादशी या सणाच्या रुपात साजरं केलं जातं. या दिवशी महिला मुलगा होण्यासाठी उपवास ठेवतात. याशिवाय मुलाबाळांच्या आयुष्यासाठी देखील देवाकडे विशेष प्रार्थना केली जाते.
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्येला कुशाग्रहणी किंवा पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी विवाहित महिला भगवान शिव आणि दुर्गा मातेची पूजा करतात. याशिवाय पिंडदानासाठी देखील हा दिवस अत्यंत लाभदायक मानला जातो.
नवऱ्याला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं, यासाठी विवाहित महिला हरतालिका तीज या सणाच्या दिवशी उपवास ठेवत असतात. याशिवाय देवाकडे कुटुंबियांच्या सुख आणि समृद्धीची कामना करत असतात.
भाद्रपद महिन्यात कलंक चतुर्थीला चंद्राचं दिसणं हे अशूभ मानलं जातं. त्यामुळंच या चतुर्थीला कलंक चतुर्थी असं म्हणतात. या सणाला चंद्राला पाहिल्यास आयुष्यात नकारात्मकता निर्माण होते. याशिवाय भगवान कृष्ण देखील चंद्राला पाहणाऱ्यांवर नाराज होतात, असं म्हटलं जातं.
महाराष्ट्रासह देशभरात यंदा येत्या १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान गणेश यांचा जन्म झाला होता. अनेक लोक घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. पुढील सात दिवस गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर गणेश मूर्तीचं पाण्यात विसर्जन करण्यात येतं.
हिंदू धर्मात ऋषी पंचमी हा सण सप्त ऋषींना समर्पित करण्यात आलेला आहे. या दिवशी सप्तऋषिंची पूजाअर्चा केली जाते. याशिवाय गंगा स्नान आणि गरिबांना दान करण्याची प्रथा या दिवशी आहे. असं केल्यास व्यक्ती पापमुक्त होतो, असं म्हटलं जातं.
भगवान कृष्ण यांच्या जन्मानंतर १५ दिवसांनी राधा यांचा जन्म झाला होता. त्यामुळं तेव्हापासून हिंदू धर्मात राधाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी व्रत केल्यास तुम्हाला कधीही धान्याची कमतरता भासणार नाही, याशिवाय राधाष्टमी साजरी केल्याने आयुष्य वाढतं, असं म्हटलं जातं.
अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते. त्यामुळं दोन्ही देव प्रसन्न झाल्याने तुम्हाला कधीही आर्थिक संकटं येत नाही. याशिवाय अडकलेली सर्व कामं मार्गी लागतात.
येत्या २९ सप्टेंबर पासून पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. तब्बल १६ दिवस चालणाऱ्या सणोत्सवात आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त केला जातो. त्यासाठी पिंडदान आणि अन्नदान करण्याची प्रथा आहे. त्यामुळं अनेक लोक पिंडदान आणि अन्नदान करत पूर्वजांच्या आठवणी जाग्या करत असतात.