मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Temples In India : अयोध्येतील राम मंदिरासारखीच भव्य आहेत देशातील ही ७ मंदिरं

Ram Temples In India : अयोध्येतील राम मंदिरासारखीच भव्य आहेत देशातील ही ७ मंदिरं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 17, 2024 11:43 AM IST

Grand Ram Temples In India : २२ जानेवारीला श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण याचे विधी आणि कार्यक्रम १६ जानेवारीपासूनच सुरू झाले आहेत. या ठिकाणी आपण देशभरातील ७ भव्य राम मंदिरांबाबत जाणून घेणार आहोत.

7 grand Ram Temples across India to visit
7 grand Ram Temples across India to visit (REUTERS)

संपूर्ण भारत देश २२ जानेवारी २०२४ ची आतुरतेने वाट पाहत आहे. या दिवशी श्री राम अयोध्येतील त्यांच्या जन्मस्थानी भव्य आणि नव्याने बांधलेल्या मंदिरात विराजमान असतील.

२२ जानेवारीला श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण याचे विधी आणि कार्यक्रम १६ जानेवारीपासूनच सुरू झाले आहेत. मंगळावरपासून (१६ जानेवारी) ते प्राणप्रतिष्ठेपर्यंत देशभरात अनेक कार्यक्रम आणि पूजा केल्या जातील.

दरम्यान, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. अशा स्थितीत या ठिकाणी आपण देशभरातील ७ भव्य राम मंदिरांबाबत जाणून घेणार आहोत.

कोदंडराम मंदिर - वोंटीमिट्टा (आंध्र प्रदेश)

आंध्रप्रदेशातील कुड्डापाह जिल्ह्यातील वोंटीमिट्टा हे स्थान कोदंडराम मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर या राज्यातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. विशेषत: वैष्णवांमध्ये. या प्राचीन मंदिराच्या बांधकामाशी आणि अस्तित्वाशी संबंधित अनेक स्थानिक आख्यायिका आहेत.  कोदंडराम मंदिर हे वोन्टुडू आणि मिट्टुडू यांनी बांधलेले आहे. वोंतुडू आणि मिट्टुडू हे दरोडेखोर होते, नंतर ते रामभक्त बनले. हे मंदिर त्यांच्या भक्तीचा पुरावा म्हणून उभे आहे.

एरी-कथा रामर मंदिर, मदुरंथाकम (तामिळनाडू)

तामिळनाडूच्या मदुरंथाकम येथील एरी-कथा रामर मंदिर खूपच प्रसिद्ध आहे. रावणाचा पराभव केल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण हे परतीच्या प्रवासात काही काळ ज्या ठिकाणी थांबले होते, त्याच ठिकाणी हे मंदिर बांधलेले आहे, असे मानले जाते.

राम तीरथ मंदिर, अमृतसर (पंजाब)

अमृतसर येथे असलेले राम तीरथ मंदिर सीता पुत्र लव आणि कुश यांच्या जन्माशी संबंधित आहे. तसेच, असे मानले जाते की भगवान रामाने माता सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मिकीजींनी सीतेला या ठिकाणी आपल्या आश्रमात आश्रय दिला होता. येथेच लव आणि कुश यांचा जन्म झाला. महर्षी वाल्मिकींनी येथेच रामायणही रचले. त्याच आश्रमात त्यांनी लव आणि कुश यांना शस्त्रे कशी वापरायची हे देखील शिकवले.

त्रिप्रयार श्रीराम मंदिर, त्रिशूर (केरळ)

त्रिप्रयार श्री राम मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. येथे स्थापित केलेल्या मूर्तीमागे या राम मंदिराची एक अतिशय विलोभनीय कथा आहे. असे मानले जाते, की त्रिप्रयार येथे ठेवलेल्या मूर्तीची पूजा भगवान श्रीकृष्णाने केली होती, ज्यांना भगवान विष्णूचा अवतार देखील मानले जाते. हे भारतातील सर्वोत्तम राम मंदिरांपैकी एक आहे.

कोडंडा राम मंदिर- चिकमंगळूर (कर्नाटक)

कोदंड रामस्वामी मंदिर हे कर्नाटकातील चिकमंगळुरू जिल्ह्याजवळील हिरेमागलूर येथे आहे. कोदंड रामस्वामी मंदिर स्कंद पुराणातील एका अनोख्या घटनेशी संबंधित आहे. मौखिक आख्यायिकेनुसार श्री रामाने परशुरामाला त्याच रूपात दर्शन देतात, ज्या वेशात त्यांनी सीतेशी विवाह केला होता.

राम राजा मंदिर - ओरछा (मध्य प्रदेश)

राम राजा मंदिर हे मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यातील ओरछा तालुक्यात स्थित आहे. हे एकमेव असे मंदिर आहे जिथे भगवान आणि राजा या दोन्हीच्या रूपात श्री रामाची पूजा केली जाते. अनेक मान्यतेनुसार, अयोध्येतील रामललाची वास्तविक मूर्ती ओरछा येथेच आहे.

श्री विजयराघव पेरुमल मंदिर- थिरुप्पुकुझी, कांचीपुरम(तामिळनाडू)

श्री विजयराघव पेरुमल मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित मंदिर आहे. हे मंदिर विष्णूला समर्पित १०८ दिव्य देसमांपैकी एक आहे. गर्भगृहाच्या आत, विजयराघव पेरुमलच्या मांडीवर जटायूचे चित्र आहे. याच ठिकाणी रामाने जटायू पक्ष्यासाठी अंतिम संस्कार केले होते.

WhatsApp channel