हरतालिकेला माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत करण्यात येते. शुक्रवार ६ तारखेला हरतालिका तृतीया आहे. वैवाहिक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात आणि लग्न न झालेल्या मुली चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात.
या व्रतात सौभाग्याच्या वस्तूचे जास्त महत्व आहे. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. यानंतर ही कथा वाचावी व रात्री जागरण करावं.
भगवान शिव आणि पार्वती सर्व गणांसह कैलास पर्वतावर, अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते. यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले, हे महेश्वर, हे माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे. मला सांगा महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत कोणतं आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले आहे?
राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, तू खूप चांगले पुण्य प्राप्त केलेस ज्यातून मी तुला प्राप्त झालो. ते व्रत भादो महिन्याच्या शुक्ल पक्षाची तीज म्हणून प्रसिद्ध आहे. हे व्रत जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो.
पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिका हे व्रत केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. तू लहानपणापासून ‘मी तुला प्राप्त व्हावे’ म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाल्ली. थंडी, पाऊस, ऊन या तिन्ही ऋतूत हे तप केले. दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या वडलांना फार दुःख आणि ‘अशी कन्या कोणास द्यावी?’ अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे असे सांगितले.
हिमालय राजा म्हणाला, महाराज, हे माझे सौभाग्य आहे की, माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईन, असे आश्वासन दिल्यावर नारदजी वैकुंठाला गेले. हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रीणीकडे गेलीस आणि तुझा शोक पाहून ती म्हणाली, देवी, मी तुला अशा गुहेत तपश्चर्यासाठी घेऊन जाईन जिथे महाराज हिमालयालाही सापडणार नाहीस. असे बोलून उमा तिच्या मैत्रिणीसह हिमालयाच्या खोल गुहेत अंतर्धान पावली.
महाराज हिमालय घाबरले, आणि पार्वतीला शोधत ते विलाप करू लागले. तू तुझ्या मैत्रीणीसोबत त्या गुहेत अन्नपाण्याशिवाय माझे व्रत सुरू केलेस, नदीच्या वाळूने शिवलिंग बनवले आणि विविध फुलांनी त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी, हस्त नक्षत्र होता. तुझ्या उपासनेमुळे माझे सिंहासन हलले आणि मी तुझ्यासमोर आलो. तुला दर्शन दिलं. तुझी इच्छा विचारू लागलो.
हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितली. तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही असेही सांगितले. ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले, तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत होते. ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले. तझे तिथे येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व झालेली हकीकत वडीलांना सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह लावून दिला. ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी, देवाब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.
पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. ‘हर’ म्हणजे अपहरण करणे आणि ‘तालिका’ म्हणजे सखी, देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले, त्यामुळे या व्रताला ‘हरतालिका’ असे म्हटले जाते.