Hartalika 2024 : विवाहित महिला वर्षातून एकदा हरतालिकेचे व्रत करतात. हरितालिका व्रत हे विवाहित,अविवाहित स्त्रिया करतात. हरितालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पुर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते. संसारातील सारी विघ्ने दूर होतात. तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे. हरतालिका पूजन मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या.
यावेळी शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी हरितालिकेचे हे पवित्र व्रत आहे. पंचांगानुसार यावेळी हे व्रत अतिशय शुभ योगात साजरे केले जाईल. या व्रतामध्ये अन्न-पाणी न घेता हे व्रत करतात. पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. या दिवशी पूजेसोबतच व्रताची कथाही ऐकली जाते. मान्यतेनुसार, विवाहित महिला या दिवशी सोळा श्रृंगार करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात.
यंदा हरतालिका व्रत ६ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. गुरुवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:२२ वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:१ वाजता समाप्त होईल. ६ सप्टेंबर रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.१ ते ८.३२ पर्यंत असेल.
वाळू, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, तसंच सोळा झाडांची प्रत्येकी १६ पानं पुजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी
ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. चौरंगाच्या चारी कोनांना केळीचे खांब बांधावे. चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करावे. डावीकडे थोड्या अक्षतांवर गणेशाचे प्रतिक म्हणून सुपारी ठेवावी. आता प्रथम श्रीगणेशाची पूजा करा. यानंतर, भगवान शिवाला बेलपत्रासह संपूर्ण पूजा अर्पण करावी. प्रथम गणपती देवाची आणि नंतर शिवशक्तीची आरती करा. कथा ऐका किंवा पठण करा. रात्री जागरण करून पुन्हा गणेशाची आणि भगवान शंकराची आरती करा.
जर तुम्ही हरतालिका साजरी करत असाल तर त्यात १६ श्रृंगारांचे विशेष महत्त्व आहे. हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जातात. या सौभाग्याच्या वस्तू पूजेत विसरू नये.
हरतालिकेसाठी निर्जला व्रत महत्वाचे आहे. माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप, तपश्चर्या आणि ध्यान केले. त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका. निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा, इतर काहीही खाऊ नका.
हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा. काळ्या बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे. काळा रंग अशुभतेचे प्रतिक आहे.
या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये. कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत.