भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात. पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून अविवाहित स्त्रिया इच्छित पती मिळविण्यासाठी हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात.
विवाहित महिला ६ सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी हरतालिका तृतीयेचे व्रत पाळतील. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळले जाते. या वेळी पौर्णिमा तिथी एक दिवस आधी सुरू होईल, परंतु उदया तिथीनुसार हरतालिकेचे व्रत ६ सप्टेंबर रोजी पाळण्यात येईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी सुरू होईल आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता समाप्त होईल. यावेळी हरतालिका व्रत शुक्रवारी असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाची पूजा केली जाते, म्हणून प्रदोष काळात हरतालिका व्रत शुभ मानले जाते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळीही पूजा केली जाते. या दिवशी मातीचे गौरी शंकर किंवा शिवलिंग बनवले जातात. सकाळी पूजा करणाऱ्यांनी शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी. पूजेपूर्वी विवाहित स्त्रिया सौभाग्याचे अलंकार घालून सुंदर तयारी करतात. तसेच, वाळू किंवा शुद्ध काळ्या मातीपासून हे शिवलिंग किंवा शिव, पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती बनवतात.
पूजेचे ठिकाण छान सजवतात. केळीच्या पानांपासून मंडप बनवले जाते. गौरी-शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग हे पूजास्थानावर चौरंगावर लाल वस्त्र पसरवून स्थापन केले जाते. त्यावर गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक केला जातो. भगवान गणेशही त्यांच्यासोबत असतो आणि त्यांना दुर्वा आणि पवित्र धागा अर्पण केला जातो. चंदन, अक्षत, धोत्रा, रुईची फुले, भस्म, गुलाल, अबीर, तसेच १६ प्रकारची पाने भगवान शंकराला अर्पण केली जातात. यादिवशी बेलपत्र वाहण्याचे खास महत्व आहे. पार्वतीला वस्त्र आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण करतात.
रात्री जागरण करून आरती करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटच्या प्रहार पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेला कुंकू कपाळावर लावला जातो. मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करतात आणि सर्व साहित्य ब्राह्मणाला दान करतात. मूर्तीच्या विसर्जनानंतरच उपवास सोडला जातो.