Guru Pratipada : श्री गुरूप्रतिपदा व गुरुवार दुग्ध शर्करा असा योग असून, १३ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जात आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. या दिवशी गुरुस्मरण केल्याने आणि गुरुचरित्र पारायण केल्याने अनेक पटींनी पुण्य फळ लाभेल असे सांगितले जाते.
श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते.
गुरुप्रतिपदा या तिथीला भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या 'विमल पादुका' स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बाराला गमन केले होते. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले असे सांगितले जाते.
गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे-त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो.
संबंधित बातम्या