Govardhan Puja 2023: दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा साजरी केली जाते. यावर्षी प्रतिपदा तिथी सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५६ मि. सुरु झाली आणि १४ नोव्हेंबरला २.३६ संपली. यामुळे गोवर्धन पूजा १४ तारखेला साजरी केली जात आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी गिरीराज म्हणजेच गोवर्धन पर्वत आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. या दिवशी घराच्या अंगणात शेणापासून गोवर्धन पर्वत तयार करून त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते. गोवर्धन पूजेची कथा द्वापर युगाशी संबंधित आहे
पौराणिक कथेनुसार, एके दिवशी श्रीकृष्णाने सर्व ब्रज लोक विविध पदार्थ बनवत असल्याचे पाहिले. सगळीकडे सजावट करण्यात आली होती. तर, अनेकजण पूजेत व्यस्त होते. त्यावेळी कृष्णाने यशोदेला कशाची तयारी सुरु असल्याचे विचारले. यावर यशोदा म्हणाली की, सर्व ब्रज लोक भगवान इंद्राची पूजा करण्याच्या तयारीत आहेत. श्रीकृष्णाने या मागचे कारण विचारले असता यशोदा म्हणाली की, इंद्रदेव पाऊस पाडतात म्हणून चांगले अन्नधान्य प्राप्त होते आणि आपल्या गायींना चारा मिळतो. यावर श्रीकृष्णा म्हणाला की, पाऊस पाडणे हे इंद्रदेवाचे कर्तव्य आहे. पूजा करायचीच असेल तर, गोवर्धन पर्वताची केली पाहिजे. कारण गोवर्धन पर्वतातून आपल्याला फळे, फुले आणि भाज्या मिळते. तिथेच आपल्या गायी चरतात.
यानंतर ब्रजचे सर्व लोक इंद्रदेवाच्या ऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले. यामुळे देवराज इंद्रदेव क्रोधीत झाले. त्यांनी रागाच्या भरात मुसळधार पाऊस सुरू केला. ज्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला. प्रत्येकजण आपापले कुटुंब आणि जनावरे वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. श्रीकृष्णामुळेच आपल्याला भगवान इंद्राचा कोप सहन करावा लागत आहे, असे ब्रजचे लोक म्हणू लागले.
यानंतर श्रीकृष्णाने सर्व ब्रज लोकांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलले.तेव्हा सर्व ब्रजवासीयांनी गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेतला. यानंतर इंद्रदेवांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी श्रीकृष्णाची क्षमा मागितली. त्यानंतर गोवर्धन पर्वताची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली.