श्रीमद भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाद्वारे जगाला गीतेचा उपदेश केला होता. महाभारतात युद्धाच्या रणांगणावर अर्जुनाची पाऊले जेव्हा डगमगू लागली होती, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला काही महत्वाचे सल्ले दिले होते. श्रीकृष्णाची ही शिकवण ऐकून अर्जुनाने आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. श्रीकृष्णाची ती शिकवण आजही तितकीच लोकप्रिय आहे. आजही आयुष्य जगण्यासाठी बहुतांश लोक गीतेतील समुपदेशांचा आधार घेतात. या सर्व उपदेशांच्या मार्गावर चालून अनेकांना आपल्या ध्येयांची प्राप्ती होते.
मानवी आयुष्यातील प्रत्येक समस्येचे समाधान गीतेत असल्याचे सांगितले जाते. गीतेत सांगितलेले श्रीकृष्णाचे उपदेश आजही मनुष्याला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतात. अशा वेळी कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि आयुष्यात यश मिळविण्यासाठी गीतेच्या काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार या उपदेशाचे जो व्यक्ती आपल्या रोजच्या जगण्यात अवलंबन करतो, तो कधीही मागे पडत नाही. त्याला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त होतो. शिवाय चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बचाव होतो. त्यातील काही उपदेश आज आपण पाहणार आहोत.
भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने उपदेश करत सांगितले आहे की, माणसाने परिणामांची चिंता सोडून कर्मावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कारण मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. त्यामुळे आपण आपले कर्म चांगले ठेवावे. आणि म्हणूनच कर्म चांगले केल्यास परिणामदेखील चांगलेच प्राप्त होणार.
श्रीकृष्णाच्या मते एखाद्या व्यक्तीला स्वतः पेक्षा चांगले कुणीही ओळखू शकत नाही. त्यामुळेच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. ज्या व्यक्तीला स्वतःची कमतरता आणि स्वतःचे प्रभावी गुण समजतात, तेव्हाच तो व्यक्ती एका उत्तम व्यक्तिमत्वाची रचना करु शकतो. आणि त्यातूनच त्याला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होऊ शकते.
श्रीकृष्णाच्या मते, आपले मनच आपल्या दुःखाचे महत्वाचे कारण असते. ज्या व्यक्तीला आपल्या मनावर आवर घालता येतो, तोच व्यक्ती विनाकारण निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि दुःखातून मुक्ती मिळवू शकतो. मनावर ताबा ठेवणारी व्यक्तीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकते.
संबंधित बातम्या