Geeta Updesh In Marathi : महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्राच्या भूमीवर झाले. हे युद्ध कौरव आणि पांडवांमध्ये झाले होते. हा केवळ एक कौटुंबिक संघर्ष नव्हता, तर धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई होती. युद्धाच्या प्रारंभी, रणांगणावर आपले नातेवाईक, शिक्षक आणि मित्र पाहून अर्जुन व्याकुळ झाला. अर्जुनने आपले कुटुंब आणि शिक्षकांविरुद्ध शस्त्र उचलण्यास नकार दिला आणि भगवान श्रीकृष्णांचे यावर मार्गदर्शन मागितले. त्याची मनस्थिती शांत करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला अवघ्या ४५ मिनिटांत जीवन, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचे रहस्य समजावून सांगितले.
माणसाने आपल्या कर्माच्या परिणामाचा विचार करून आपले काम करू नये, तर आपले कर्तव्य नि:स्वार्थपणे पार पाडावे, असे त्यांनी सांगितले. प्रजेचे रक्षण करणे आणि अधर्म दूर करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अर्जुनला समजले की, श्रीकृष्ण हे सामान्य व्यक्ती नसून ते स्वतः भगवान आहेत. गीता हा ग्रंथ मूळतः संस्कृत भाषेत लिहिला गेला होता. परंतु आता त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ज्यामध्ये हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, गुजराती, मराठी, पंजाबी इत्यादी भाषांचा समावेश आहे. आज आपण याच ग्रंथातील भगवान श्रीकृष्णाची एक मोठी शिकवण जाणून घेऊया...
गीतेत लिहिले आहे की, तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन बदलणे म्हणजे तुमच्या दु:खाचा अंत आहे, हे समजून घ्या. एखाद्याच्या दुःखासाठी आणि त्रासासाठी बाहेरच्या जगाला दोष देणे योग्य नाही, तर स्वत:चे मन समजून घेऊन, स्वत:च्या दु:खाचे निराकरण आत्मपरिवर्तनातून केले पाहिजे.
या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण सांगतात की, ‘माणसाने नेहमी स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःची अधोगती कधी करू नये. माणूस स्वतः स्वतःचा मित्र आणि शत्रू आहे. याचा अर्थ मनुष्याचे मन त्याला बांधून ठेवते आणि मनच त्याला मुक्त करते. त्यामुळे मनपरिवर्तन करूनच आपल्या दुःखांपासून मुक्ती मिळू शकते.’
आत्मा अमर आणि अविनाशी आहे, तर शरीर नश्वर आहे. श्रीकृष्णाने हे सांगताना उदाहरणही दिले की, ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे सांगताना त्यांनी अर्जुनला कर्तव्य बजावण्याचे महत्त्व सांगितले.