Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ शिकवणी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्यात! तुम्ही वाचल्यात का?-geeta updesh in marathi everyone should know these teachings in bhagavad gita ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ शिकवणी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्यात! तुम्ही वाचल्यात का?

Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ शिकवणी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्यात! तुम्ही वाचल्यात का?

Sep 05, 2024 05:00 AM IST

Geeta Updesh In Marathi: भगवद्गीता केवळ अर्जुनालाच नाही, तर या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक मानवाला आयुष्याचे धडे शिकवते. भगवद्गीतेतून प्रत्येक व्यक्तीने अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत.

Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ शिकवणी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्यात!
Geeta Updesh: भगवद्गीतेतील ‘या’ शिकवणी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्यात!

Geeta Updesh In Marathi: भगवद्गीता हा हिंदूंच्या सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णाने शिकवलेले ज्ञान आणि जीवनाचे धडे भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की, भगवद्गीतेची रचना ५ हजार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. भगवद्गीतेमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टींविषयी सांगण्यात आले आहे. भगवद्गीतेची सुरुवात अर्जुनाने आपली सर्व शस्त्रे खाली टाकून रणांगण सोडल्याने होते. युद्धात आपलेच लोक मारले जातील, हा विचार अर्जुनाला सहन होत नव्हता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेच्या रूपात जीवनाचे ज्ञान दिले. राजा म्हणून आपले कर्तव्य कसे पार पाडावे, हे सांगितले.

भगवान श्रीकृष्णाने उपदेश केल्यानंतर शेवटी अर्जुन पुन्हा शस्त्र हाती घेतली आणि रणांगणात शत्रूचा पराभव केला. भगवद्गीता केवळ अर्जुनालाच नाही, तर या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक मानवाला आयुष्याचे धडे शिकवते. भगवद्गीतेतून प्रत्येक व्यक्तीने अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत.

 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥

अर्थ: भगवद्गीतेतील हा एक प्रसिद्ध श्लोक आहे, जो प्रत्येक माणसाने आयुष्यभर लक्षात ठेवायला हवा. याचा अर्थ तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडा, परंतु त्याच्या परिणामाचा विचार करू नका. म्हणजे तुम्ही फक्त काम पूर्ण करण्यावर आणि कार्य कुशलतेने करण्यावर भर द्यावा. म्हणजे त्या कामाचे फलित काय होईल याचा विचार आधीपासूनच करणे थांबवा. जर, तुम्ही परिणामाचा विचार केला, तर तुम्ही सुरू केलेले काम तुम्ही पूर्ण करू शकत नाही.

 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। 

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

अर्थ: आत्मा खूप बलवान आहे. याचा अर्थ असा आहे की, ते कोणत्याही शस्त्राने फाडता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, वारा आणि पाणी देखील आत्म्याचा नाश करू शकत नाही. भगवद्गीता म्हणते की, आपल्यातील आत्मा खूप बलवान आणि शक्तिशाली आहे. आत्मा बाह्यतः दिसत नाही, परंतु तो खूप मजबूत आहे. आत्मा ही तुमची आंतरिक ऊर्जा आहे. याचाच अर्थ मन आणि मेंदू या दोन्ही गोष्टी मजबूत ठेवल्या, तर तुम्ही काहीही साध्य करू शकता.

 

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्॥

अर्थ: भगवद्गीतेतील हा श्लोक मनुष्याच्या आत्म-नाशाकडे नेणाऱ्या घटकांचे वर्णन करतो. माणसाला वासना, क्रोध, लोभ... या तिन्ही गोष्टींचा अतिरेक असेल तर त्याने ताबडतोब त्यापासून मुक्त व्हावे. अन्यथा, तो स्वतःच त्याचे पतन विकत घेतो. वासना, क्रोध आणि लोभ हे चुकीचे मार्ग आहेत. ते अगदी बलवान आणि शहाण्या माणसांचा नाश करतात. यामुळे तुमचे जीवन धोक्यात येईल आणि पराभवाच्या उंबरठ्यावर आणले जाईल. त्यामुळे तुम्हाला फक्त त्या तिघांमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.