Geeta Updesh In Marathi: श्रीमद्भगवद्गीता ही सनातन धर्माच्या प्रमुख धर्मग्रंथांपैकी एक आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे तपशीलवार वर्णन आहे. महाभारत युद्धापूर्वी अर्जुनाला त्याच्या कर्तव्याबाबत शंका आणि संभ्रमावस्थेत पाहून भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनातील सखोल रहस्ये आणि धर्म, योग, कर्म आणि भक्तीचा मार्ग शिकवला. कुरुक्षेत्राच्या रणांगणात स्वतःचे नातेवाईक, गुरू आणि मित्र युद्धासाठी तयार झालेले पाहून अर्जुन निराश झाला होता. त्याची ही द्विधा अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश दिला. गीतेतील तत्त्वे माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. गीतेतील शिकवणींचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. जे लोक गीतेची शिकवण आपल्या जीवनात अंगीकारतात त्यांच्यापासून राग, मत्सर आणि इतर नकारात्मक भावना दूर होतात.
गीता उपदेशावेळी भगवान श्रीकृष्णांनी आनंदी राहण्यासाठी एक सोपा मंत्र दिला आहे. त्यानुसार, कोण काय करतंय, ते कसं करतंय, का करतंय यापासून तुम्ही जितके जास्त दूर राहाल, तितके तुम्ही मन:शांतीच्या जवळ जाल. त्यामुळे कोणाच्याही कामात ढवळाढवळ करू नका, आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा. भगवान श्रीकृष्णाने गीतेचे सार सांगताना म्हटलंय की, कोणतीही व्यक्ती सरत्या वेळेबरोबर वाईट काळ विसरते, परंतु वाईट काळात लोकांचे वागणे कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे जर कोणावर वाईट वेळ आली असेल, तर त्याच्यावर हसता कामा नये. कारण काळाचे चाक फिरत राहते आणि ते नक्कीच परतून येऊ शकते.
भगवान श्रीकृष्णाच्या मते, मनुष्याच्या जीवनातील दुःखांचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या आशा आणि इच्छा. माणसाच्या इच्छा खूप प्रबळ असतात आणि जेव्हा त्याच्या इच्छेनुसार काम होत नाही, तेव्हा त्याचे मन दुःखी होते. जर, मनुष्याने आपल्या इच्छांचा त्याग केला, तर तो जीवनात नेहमी आनंदी राहील. कर्माचा फटका इतका भयंकर असतो की, सर्व संचित पुण्य नष्ट होते. पुण्य संपले की, कर्तृत्ववान राजालाही भीक मागावी लागते. म्हणून, कधीही कोणाची फसवणूक करू नका किंवा कोणाच्या आत्म्याला दुखवू नका.
गीता प्रवचनाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की, जेव्हा व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करू लागतो, त्याला दुखावण्यासाठी वाईट गोष्टी करू लागतो, तेव्हा तो त्या व्यक्तीसाठी नाही तर स्वतःसाठी वेदनादायक परिस्थिती निर्माण करतो. प्रत्येक व्यक्तीला या जन्मात त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. त्यामुळे सतत चांगले काम करण्याचा प्रयत्न करा.