Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीता हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि सर्वत्र स्वीकृत धार्मिक ग्रंथ मानला जातो. वास्तविक हिंदू धर्मात अनेक धर्मग्रंथ आणि पुराणे आहेत. पण, गीता हा असा एकमेव धर्मग्रंथ आहे, ज्याची जयंती साजरी केली जाते. गीता वाचून माणसाला जीवनाचा योग्य मार्ग मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने गीता जरूर वाचलीच पाहिजे. गीतेमध्ये १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. गीतेची शिकवण जर तुम्ही अंगिकारली, तर तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाऊ शकते. हिंदू धर्मात ज्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही गीता वाचली नाही, त्याचे जीवन निरर्थक मानले जाते. गीतेमध्ये ज्ञानाचा एवढा खजिना आहे की, प्रत्येक वेळी तुम्ही ती वाचलीत की तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते.
गीताच्या पठणातून आपल्याला जीवन काय आहे, आत्मा भगवंताशी कसा एकरूप होतो, चांगल्या आणि वाईट कर्मांमधील फरक समजतो. पण गीतेचे संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी गीता वाचण्याचे नियमही जाणून घेणे गरजेचे आहे. गीता वाचण्याचे नियम जाणून घेऊया.
गीता किंवा कोणत्याही ग्रंथातून ज्ञान प्राप्त करण्याचे चार टप्पे आहेत, जे पुढीलप्रमाणे आहेत - श्रवण किंवा वाचन, ध्यान ज्ञान, निदिध्यासन ज्ञान आणि अनुभवी ज्ञान. या चार पायऱ्या पार केल्यावरच गीतेचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. याप्रमाणे या चार पायऱ्या तपशीलवार समजून घेणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुम्ही प्रथम गीता वाचा किंवा ऐका. यानंतर, प्राप्त झालेल्या ज्ञानावर विचार आणि मनन करा. जे काही ज्ञान तुम्हाला तुमच्या जीवनात उपयुक्त वाटेल, ते आचरणात आणा आणि जीवनात आत्मसात करा. मग, शेवटी तुम्हाला त्या ज्ञानाचे फळ मिळेल.
गीता पठणाविषयी बोलताना असे म्हटले जाते की, जेव्हा गीता पहिल्यांदा वाचली जाते, तेव्हा आपण ती आंधळ्याप्रमाणे वाचतो. याचाच अर्थ आपण वाचतो, पण समजू शकत नाही. पण, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा गीता वाचाल, तेव्हा तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होतील की, असे का झाले किंवा तसे का झाले. जेव्हा तुम्ही गीता तिसऱ्यांदा वाचाल, तेव्हा तुम्हाला तिचा अर्थ कळायला लागेल आणि चौथ्यांदा गीता वाचून तुम्ही हळूहळू एखाद्या पात्राशी आणि भावनांशी जोडले जाल. अर्जुन किंवा दुर्योधनाच्या मनात काय चालले आहे, ते तुम्हाला समजू लागेल.
तुम्ही पाचव्यांदा गीता वाचाल तेव्हा संपूर्ण कुरुक्षेत्र तुमच्यासमोर उभे आहे, असे तुम्हाला वाटेल. गीतेचे सहाव्यांदा वाचन केल्याने भगवंत गीतेचे ज्ञान अर्जुनला नाही, तर आपल्याला देत असल्याची अनुभूती येईल. पण, जेव्हा तुम्ही सातव्या किंवा आठव्यांदा गीता वाचाल, तेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे जाणवेल की, कृष्ण इतरत्र कुठेही नसून आपल्यामध्येच आहे.
गीता पठण करण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे. यावेळी मन, मेंदू आणि वातावरण शुद्ध, शांत आणि सकारात्मक असते. लक्षात ठेवा की, नेहमी स्नान केल्यानंतर किंवा शुद्ध अवस्थेतच गीता पाठ करा. तसेच, पठण करताना पुन्हा पुन्हा उठू नका आणि इकडे तिकडे लक्ष वळवू नका. नेहमी स्वच्छ जमिनीवर आसन पसरूनच गीता वाचावी. प्रत्येक अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीकृष्ण आणि गीतेच्या चरणकमळांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.