Geeta Updesh In Marathi: महाभारताच्या युद्ध भूमीत जेव्हा आपल्या आप्तस्वकीयांविरोधात शस्त्र उचलण्याची वेळ आली तेव्हा, अर्जुन डगमगला. आपण ज्यांच्या विरोधात लढतोय, ते आपले पितातुल्य लोक आहेत, या भावनेने त्याचे मन युद्धासाठी धजावत नव्हते. त्यावेळी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीतेचं सार समजावलं. युद्धभूमीवर कुणीही आपल्या नात्यातील नसतं. सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने लढणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. याच वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला आणखी काही मोलाचे सल्ले दिले, जे आजही भगवदगीतेच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात. गीतेतील हे सल्ले आपल्या आजच्या आयुष्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचे आहेत.
महाभारतात अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे अनेक नितीमुल्य लाथाडली गेली. कौरवांच्या वागण्यामुळे अनेकांची मने तर दुखावलीच. पण, त्यांचं वागणं हे धर्माला अनुसरून नव्हतं. मात्र, याच अनन्याविरोधात जेव्हा युद्धभूमीत लढण्याची वेळ आली, तेव्हा अर्जुनाच्या मनातील विश्वास डळमळीत झाला. त्यावेळी अर्जुनाला उद्देशून श्रीकृष्ण म्हणाले की, ‘जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल, तोपर्यंत दुसरं कुणीतरी तुमच्या आयुष्याचे निर्णय घेत राहील. म्हणूनच, आपल्या मनातील भीतीवर मात करून निर्भयपणे पुढे जा.’
अर्जुनाला स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देतानाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे तुमच्यावर प्रेम करतात आणि विश्वास ठेवतात, त्यांचा कधीही विश्वासघात करू नका. नातेवाईकांशी बोलताना आणि त्यांच्यासोबत आयुष्यात पुढे जाताना, अनेक वेळा नीट विचार करा.
भगवद्गीता शिकवते की, एखाद्याच्या कर्मावर कधीही शंका घेऊ नये. असे केल्याने माणूस स्वतःचा नाश करतो. त्यामुळे तुम्हाला काही साध्य करायचे असेल, तर ते श्रद्धेने करा. तरच, तुम्ही यशाच्या मार्गावर चालू शकाल. भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार, वाईट संगती माणसासाठी कोळशासारखी आहे. कोळसा गरम झाल्यावर हात जळतो. खूप थंड झाल्यावर हात काळे होतात. तशीच वाईट संगतही मनुष्याच्या आयुष्यातील एक कलंक बनते.
कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे, असे गीतसूक्ती सांगते. काम करताना नेहमी तुमचे मन शांत आणि स्थिर ठेवा. क्रोध आपल्या शांतीचा नाश करतो. यामुळे आधीच केलेले काम देखील खराब होऊ शकते. त्यामुळे मन नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. भगवद्गीतेमध्ये १८ अध्याय आणि ७२० श्लोक आहेत. त्यातील शिकवण व्यक्तीला चांगल्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करते.
संबंधित बातम्या