या वेळी ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणजेच महालक्ष्मी मंगळवार, १० सप्टेंबर रोजी पडत आहे. पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होत असून, १० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी समाप्त होत आहे. उदया तिथीनुसार १० सप्टेंबर मंगळवार रोजी ज्येष्ठा गौराईच आगमन होणार आहे.
परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणावेत. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना करावी. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे, असे संबोधतात.
कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या गौराई असतात. कदाचित अनेक हिंदू अनुयायांना या व्रताबद्दल माहिती नसेल. हे व्रत फार कमी घरांमध्ये पाळले जाते.
सनातन संस्था सांगते की राक्षसांनी पीडित सर्व स्त्रियांनी श्री महालक्ष्मी गौरीचा आश्रय घेतला आणि त्यांचे लग्न कायमस्वरूपी व्हावे म्हणून त्यांना प्रार्थना केली. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले. त्यामुळे अखंड वैवाहिक सुख प्राप्तीसाठी महिला ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात.
गौरी आवाहनच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तीसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. अनुक्रमे ११ सप्टेंबरला गौरी पूजन केले जाईल तर १२ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन केले जाईल. गौरी पूजनाच्या दिवशी सगेसोयरीक जेवणाला सांगितले जातात. गौरी पूजन आणि आरती करतात तसेच जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी करतात.
तीसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.