मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : नरक कसा आहे? यमराजाचा महाल कसा आहे? जाणून घ्या

Garuda Purana : नरक कसा आहे? यमराजाचा महाल कसा आहे? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 10, 2024 04:05 PM IST

Garuda Purana : यमराज हा सूर्यदेवाचा पुत्र आहे. यमराजाला मृत्यूचा देवता म्हणतात. गरुड पुराणात यमराजापासून यमलोकापर्यंत सर्व गोष्टींचे वर्णन केले आहे. हिंदू धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात.

garud puran
garud puran

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा बरेच लोक घरामध्ये गरूड पुराणाचे पठण करतात. अशी मान्यता आहे, की मृत्यूनंतर आत्मा १३ दिवस घरातच राहतो. म्हणून आत्म्याला गरूड पुराणाचा पाठ सांगितला जातो. असे केल्याने व्यक्तीला यमराजाच्या शिक्षेपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय गरूड पुराण ऐकून इतर लोकांनाही धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते.

गरुड पुराणात सांगितले आहे, की माणसाला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग आणि नरक मिळतो. मानवी शरीरातून प्राण कसे जातात, मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, आत्मा कधी आणि किती काळासाठी यमलोकात जातो, या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात सापडतात.  आज येथे आम्ही तुम्हाला मृत्यूचा देवता यमराजाचे निवासस्थान असलेल्या यमलोकाबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. 

यमराज हा सूर्यदेवाचा पुत्र आहे. यमराजाला मृत्यूचा देवता म्हणतात. गरुड पुराणात यमराजापासून यमलोकापर्यंत सर्व गोष्टींचे वर्णन केले आहे. हिंदू धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तेथे माणसाला त्याच्या कर्मावर आधारित परिणाम भोगावे लागतात.

स्वर्ग किंवा नरक कर्मावर अवलंबून 

देवांचा लेखापाल आणि यमाचा सहाय्यक म्हणून ओळखला जाणारा चित्रगुप्त मानवी आत्म्यांचा हिशेब ठेवतो. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे, व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून त्याला स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो. माणसाला चांगल्या कर्मांसाठी स्वर्ग मिळतो, तर वाईट कर्मांसाठी नरक भोगावा लागतो.

यमराजाचा महाल कसा आहे?

गरुण पुराणात यमराजाच्या महालाचे वर्णन आले आहे. त्यानुसार यमराजाच्या महालाचे नाव कालित्री आहे. त्याच्या सिंहासनाचे नाव विचार-भू आहे. यमलोकाची इमारत देवशिल्पी विश्वकर्मा यांनी बांधली आहे. पद्म पुराणात यमलोक ८६ हजार योजन म्हणजेच पृथ्वीपासून सुमारे १२ लाख किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले आहे.

नरक कसा आहे?

गरूड पुराणात यमलोकाचे वर्णन फार भयावह आहे. यानुसार येथील आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार विविध प्रकारच्या परिणामांना सामोरे जावे लागते. यमलोकात ४ दरवाजे आहेत, यातून विविध आत्म्यांना प्रवेश मिळतो.

सत्पुरुष आणि पुण्यवान आत्म्यांना पूर्वेकडील दरवाजातून प्रवेश दिला जातो, तर पापी आत्म्यांना दक्षिणेकडील दरवाजातून प्रवेश दिला जातो. त्याच वेळी, उत्तर दरवाजा संतांच्या प्रवेशासाठी आहे आणि पश्चिम दरवाजा दान आणि पुण्य करणाऱ्या लोकांसाठी खुला आहे.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel