Garud Puran: मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Garud Puran: मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?

Garud Puran: मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?

Feb 04, 2025 10:11 AM IST

Garud Puran: मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. मृत्यूनंतर आपल्या कर्मानुसार व्यक्तीला गती प्राप्त होते, असे ढोबळ मानाने मानले जाते. गरुड पुराणानेही या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. जाणून घेऊ या, मृत्यूनंतरच्या स्थितीबाबत गरुड पुराण काय सांगते?

मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?
मृत्यूनंतर नेमकं काय होतं? आत्मा यमलोकात किती दिवसात पोहोचतो, काय सांगते गरुड पुराण?

Garud Puran: गरुड पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे. गरुड पुराणात एकूण १९ हजार श्लोक आहेत. यांपैकी तब्बल ७ हजार श्लोक हे माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. यात स्वर्ग, नरक, रहस्य, नीती, धर्म, ज्ञान अशा गोष्टींचा उल्लेक आहे. आज आपण मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते याबाबत गरुड पुराण काय सांगते हे पाहणार आहोत.

गरुड पुराण वाचल्यावर तुम्हाला मृत्यूबाबत आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत बरीच माहिती मिळते. यात मृत्यनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे वर्णन करण्यात आलेले आहे. मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन, नरक, स्वर्ग, पाप अशा बाबींवर गरुड पुराणात चर्चा करण्यात आलेली आहे. या पुराणानुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमलोकात पाठवला जातो. तेथे त्याच्या कर्माचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार त्या व्यक्तीला पुढील प्रवासासाठी पाठवले जाते असे म्हटले गेले आहे. या प्रवासात आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते असे म्हणतात.

आत्म्याला प्राप्त होते दिव्य दृष्टी

गरुड पुराणात असे म्हटले आहे की, मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. हा आत्मा मग यमलोकाकडे जातो. जीवनातील गुण-दोषांनुसार आत्म्याला प्रवासात पुढे पाठवले जात जाते. तसेच या आत्म्याला मोक्ष प्रात होण्याबाबतही चर्चा करण्यात आलेली आहे. नकारात्मक शक्ती दूर होतात.

मृत्यूनंतर नेमके काय घडते?

गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर व्यक्तीचा आवाज कमी होतो. त्यानंतर त्याची सर्व इंद्रिये बंद होतात. शेवटच्या क्षणी व्यक्तीला परमेश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते.

मृत्यूनंतर यमराजाचे दोन दूत व्यक्तीचा आत्मा घ्यायला येतात. त्यांचे रुप अतिशय भयंकर असते. व्यक्तीला ते पाहणे कठीण असते. जशी व्यक्ती पृथ्वीवर लोकांशी वागलेली आहे, त्या प्रकारे आलेले यमदूत या व्यक्तीशी वागतात. मरणारी व्यक्ती जर सत्यानुसार चालणारी आणि सदाचारी असेल तर यमदूत त्याला चांगली वागणूक देतात. त्या व्यक्तीचे प्राणत्याग होत असताना त्याला कोणतीही अडचण येत नाही. यमदूत अशा व्यक्तीला कोणताही त्रास न देता शांतपणे यमलोकात घेऊन जातात.

जर व्यक्तीने पापकर्म केलेली असतील, तर यमदूत अशा व्यक्तीला वेदना देतात. गळ्यात फास बांधतात आणि ओढत नेतात. पुढे अशा व्यक्तीला यमलोकात भयंकर यातना सहन कराव्या लागतात.

आत्मा पुन्हा घरी सोडला जातो

मृत्यूनंतरची सगळी कार्ये करण्यासाठी हा आत्मा पुन्हा घरी सोडला जातो. तो कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो पाशात बांधला गेलेला असल्याने त्याला कोणतीही मोकळीक मिळत नाही.

मृत्यूनंतर १० व्या दिवशी घरी विधी केल्या जातात. या दिवशी कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात. त्यावेळी आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते. याच दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबीयांशी आणि जगाशी असलेला संबंध संपतो.

मृत्यूनंतर १३ व्या दिवशी पुन्हा येतात यमदूत

व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तेथे आत्म्याच्या कर्माचा हिशेब केला जातो. त्यानुसार या आत्म्याला अर्ची मार्ग म्हणजे स्वर्ग, धूम मार्ग म्हणजे पितृ लोक किंवा मत उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजे नरक लोकाची गती प्राप्त होते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गरुड पुराण या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. त्याच प्रमाणे यातून कोणत्याही अंधश्रद्धेला देखील आम्ही खतपणी घालत नाही,किवा दुजोराही देत नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner