How to Perform Ganesh Visarjan 2024 at Home : गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविक श्री गणेशाला विधीपूर्वक निरोप देतात. चतुर्थी तिथीलाच पूजा केल्यानंतर दीड दिवसाचा, ५ दिवसाचा, ७ दिवसाच्या आपल्या परंपरेनुसार गणेश विसर्जनही करता येते. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. चतुर्दशी तिथी हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. हा दिवस गणेश विसर्जन म्हणून ओळखला जातो.
गणेशोत्सवाची आता सांगता होत आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. मंडळांसह हजारो घरगुती गणपतीचे विसर्जन या दिवशी होईल. भाविकांचा, भक्तांचा यथोचित पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाईल. बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात. साश्रू नयनांनी गणरायाला निरोप दिला जातो.
गणेशोत्सवाच्या ११ व्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. काही लोक घरच्या घरी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतात. जाणून घ्या घरी गणेश विसर्जन कसे करावे आणि गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त-
यंदाचे गणेश विसर्जन १७ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. चतुर्दशी तिथी १६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटापर्यंत सुरू राहील.
१७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश विसर्जनासाठी सकाळचा शुभ मुहूर्त ८ वाजून ३८ मिनिटे ते दुपारी १ वाजून १३ मिनिटापर्यंत असेल. दुपारची शुभ वेळ दुपारी २:४४ ते ४:१६ पर्यंत असेल. संध्याकाळी शुभ मुहूर्त ७:१६ ते ८:४४ पर्यंत असेल.
सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ इ. कार्य करावे. प्रार्थनास्थळ स्वच्छ करा. गणेश विसर्जनासाठी तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना आमंत्रित करा. गणपतीसाठी नैवेद्य तयार करा. शुध्द तुपाचा दिवा लावा आणि श्रीगणेशाला टिळा लावा. कुंकू, लाडू आणि मोदक अर्पण करा. विसर्जन करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची आरती करा, गणपती बाप्पाचा जयजयकार करा. निरोप देण्यापूर्वी संपूर्ण घरात गणपती बाप्पाला फिरवा. यानंतर एका बादलीत किंवा टबमध्ये गणरायाची मूर्ती बुडेल एवढे पाणी ओतून घ्या. सुख, समृद्धीसाठी आणि पुढील वर्षी लवकर येण्यासाठी गणेशाला प्रार्थना करा. मूर्ती पाण्यात तीन वेळा बुडवा आणि शेवटी पूर्णपणे विसर्जित करा. हे पाणी घरभर शिंपडावे. तुम्ही हे पाणी झाडांना देखील टाकू शकता.