भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला. यामुळेच हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून तिची स्थापना करतात आणि श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात.
सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा करण्याला शास्त्रोक्त महत्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. परंतू भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी येतो आणि हा गणेशोत्सव जल्लोषात, उत्साहात साजरा केला जातो.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३१ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३७ वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी व्रत करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
शनिवार ७ सप्टेंबर रोजी मध्यान्ह गणेश पूजनाचा मुहूर्त सकाळी ११:३ ते दुपारी १:३४ पर्यंत असेल, ज्याचा कालावधी - २ तास ३१ मिनिटे आहे. त्याचबरोबर १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होणार आहे.
गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात श्री गणेशाची स्थापना करा. पूजेचे साहित्य घेऊन आसनावर बसा. पूजेच्या स्थानावर पवित्र गंगा जल शिंपडा. श्रीगणेशाच्या मूर्तीच्या पूर्व दिशेला कळस ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा लावा. स्वतःवर पाणी शिंपडताना ॐ पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. गणपतीला नमस्कार करून तीन वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा. दिवा लावा. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल, दुर्वा, जाणवं, पान सुपारी अर्पण करा. यानंतर गणपती बाप्पाला वस्त्र, चंदन, अक्षदा, धूप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. श्री गणेशाची आरती करा, मंत्रपुष्पांजली, कपुरआरती म्हणा आणि क्षमा प्रार्थना करा. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया. यानंतर गणपतीजवळ नैवेद्य, प्रसाद ठेवा. कुटुंबातील सर्वांना प्रसाद द्या. स्वl: प्रसाद ग्रहण करा. तसेच तुम्ही दीड, पाच, सात, दहा जितके दिवस गणपती बसवतात तितके दिवस दररोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती करा.