Ganeshotsav : गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुराचा वध केला जाणून घ्या-ganpati festival 2024 bappa various incarnations different avatar of lord ganesha ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganeshotsav : गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुराचा वध केला जाणून घ्या

Ganeshotsav : गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुराचा वध केला जाणून घ्या

Sep 10, 2024 02:48 PM IST

Ganpati Bappa Different Avatar : गणपती बाप्पा आल्याने वातावरणात उत्साह पसरला आहे. गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. जाणून घ्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुराचा वध केला.

गणपती बाप्पाचे विविध अवतार
गणपती बाप्पाचे विविध अवतार

गणेश उत्सवाचे हे दहा दिवस खूप खास असतात. या काळात लोक देवाला प्रसन्न करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने त्यांचा विशेष आशीर्वादांचा वर्षाव होतो आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते. गणपती बाप्पाच्या विविध कथा सांगितल्या जातात. जाणून घेऊया गणपती बाप्पाचे विविध अवतार आणि त्यांनी कोणत्या असुराचा वध केला.

गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे.

महोत्कट विनायक – 

हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. .महोत्कट विनायकाचे वाहन सिंह आहे. या गणेशाने कश्यप आणि दिती यांच्या पोटी जन्म घेतला व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात गणपती बाप्पाने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.

मयूरेश्वर – 

हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे. याचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेय यास दान केला अशी आख्यायिका आहे. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.

गजानन – 

हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार आहे. याचे वाहन उंदिर आहे. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला. अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.

धूम्रकेतु – 

द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी असा हा अवतार आहे. याचे वाहन निळा घोडा आहे. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. 

तसेच, मुद्गल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे,

वक्रतुण्ड – 

हा प्रथम अवतार. याचे वाहन सिंह असून या अवतारातमात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.

एकदन्त – 

आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो. हा मूषकवाहन असून अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.

महोदर – 

वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक. मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.

गजवक्त्र वा गजानन – 

हा अवतार म्हणजेच महोदर अवताराचे अन्यरूप असून, याने लोभासुर (लोभ) याचा वध केला.

लंबोदर – 

हा अवतार ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक आहे. याचे वाहन मूषक आहे. याने क्रोधासुराचा वध केला.

विकट – 

हा अवतार सूर्याचे प्रतीक आहे. विकटाने कामासुराचा वध केला. याचे वाहन मयूर आहे.

विघ्नराज – 

हा अवतार विष्णूचे प्रतीक आहे. ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य होते.

धूम्रवर्ण – 

हा अवतार शिवाचे प्रतीक आहे. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक आहे. याचे वाहन घोडा आहे. धूम्रवर्णाने अभिमानासुराचा नाश केला.

Whats_app_banner
विभाग