वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गंगा सप्तमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक गंगा मातेची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान ब्रह्मदेवाच्या कमंडलातून गंगा देवीचा जन्म झाला होता. या वर्षी १४ मे २०२४ रोजी गंगा सप्तमी साजरी होणार आहे. जाणून घ्या गंगा पूजनाचे महत्व आणि पूजा पद्धत.
हिंदू कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी सप्तमी तिथी १३ मे २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ मे २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी संपेल. उदयातिथी लक्षात घेतली तर १४ मे २०२४ रोजी गंगा सप्तमीचा सण साजरा केला जाणार आहे.
भारतातील बऱ्याच धार्मिक संकल्पनांमध्ये, गंगा नदीला देवी म्हणून दर्शविले गेले आहे. गंगा नदीच्या काठावर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. गंगा नदीची पूजा भारताच्या पवित्र नद्यांपैकी सर्वात पवित्र म्हणून केली जाते. असे मानले जाते की गंगा स्नान केल्याने मानवाची सर्व पापं दूर होतात. लोकांना गंगा तिरी मृत्यु यावा किंवा मरणानंतर, गंगामध्ये त्यांची राख विसर्जीत करणे मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक मानले जाते.
शास्त्रानुसार गंगा सप्तमीला गंगेच्या तीरावर श्राद्ध केल्याने पितृदोष नाहीसा होतो आणि अकाली निधन झालेल्या पितरांना मोक्ष मिळतो. पौराणिक मान्यतेनुसार गंगा सप्तमीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चरणकमलांची पूजा करून गंगा माता आपल्या जगात स्थान मिळवते. यामुळेच या दिवशी गंगेत श्रद्धेने स्नान करणाऱ्यांना उत्तम आरोग्य तसेच प्रत्येक कार्यात यशाचे वरदान मिळते. असे म्हटले जाते की ज्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा येत असेल त्यांनी या दिवशी पितरांचे तर्पण करावे. यामुळे वैवाहिक जीवन तर आनंदी होतेच, पण संतती सौख्यही लाभते.
गंगा सप्तमीच्या दिवशी पाण्यात गंगाजल मिसळून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. यानंतर गंगा मातेचे चित्र स्थापित करा आणि कलशात थोडे गंगाजल भरा. देवीला फुले, सिंदूर, अक्षत, गुलाल, लाल फुले, लाल चंदन अर्पण करा. यानंतर गूळ, मिठाई आणि फळे अर्पण करा. शेवटी उदबत्ती पेटवून श्री गंगा सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. यासोबतच गंगाजीच्या वैदिक मंत्रांचा जप करा.
आरती करून पूजेची सांगता करा. तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. गरिबांना अन्न द्या. शेवटी, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा. तसेच पूजेदरम्यान झालेल्या चुकांची माफी मागावी. यादिवशी पवित्र अशा गंगा नदीला लाखो भाविक भेट देतात. तसेच भव्य आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेतात.