Ganesh Chaturthi Puja Muhurta : गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण साहित्याची यादी-ganesh chaturthi 2024 pujan muhurta and puja sahitya list for ganpati festival ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ganesh Chaturthi Puja Muhurta : गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण साहित्याची यादी

Ganesh Chaturthi Puja Muhurta : गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण साहित्याची यादी

Sep 02, 2024 04:04 PM IST

Ganesh Chaturthi Puja Muhurat 2024 : गणेश चतुर्थीचा सण भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. हा सण गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणून ओळखला जातो. जाणून घ्या यंदाच्या गणेश चतुर्थीला पूजेची वेळ काय आहे आणि गणेश विसर्जन कधी आहे-

गणेश चतुर्थी २०२४
गणेश चतुर्थी २०२४ ((Photo- Istock))

Ganesh Chaturthi 2024 Puja Muhurat : हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण गणपती बाप्पाला समर्पित असून, संपूर्ण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते.

गणेश चतुर्थी २०२४ कधी आहे: 

२०२४ मधील गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर, शनिवारी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक बाप्पाचे स्वागत करतात आणि थाटामाटात आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात . महाराष्ट्रात या उत्सवाची शोभा पाहण्यासारखी आहे.

गणेश चतुर्थी पूजा मुहूर्त - 

असे मानले जाते की, भगवान गणेशाचा जन्म मध्यान्हाच्या वेळी झाला होता, म्हणून मध्यान्हाची वेळ गणेशपूजेसाठी सर्वात योग्य मानली जाते. पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ०३ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३३ मिनिटापर्यंत असेल. पूजेचा एकूण कालावधी २ तास ३१ मिनिटे आहे.

चतुर्थी तिथी प्रारंभ आणि समाप्ती - 

पंचांगानुसार, चतुर्थी तिथी ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ०१ मिनिटे ते ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील.

गणेश चतुर्थीच्या पूजेचे साहित्य -

वाती (समईसाठी आणि तुपात भिजवलेल्या), फुलवाती तुपात भिजवलेल्या, कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र, जानवं, गणपतीसाठी सजावटीचे सामान, फुले, फुलांचे हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य दही आणि दुध, गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर, चौरंगावर ठेवण्यासाठी आसन, रांगोळी, रांगोळीचे रंग, समई, समईसाठी वाती, निरांजन (२), निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती, आरती करण्यासाठी पंचारती, आरतीसाठी तुपात भिजवलेल्या वाती, तांदूळ, घंटा, शंख, उदबत्तीचे घर/ स्टॅंन्ड, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, विड्याची पाने - २५ नग, सुट्टे पैसे (नाणी १०), सुपाऱ्या, खारीक, बदाम, हळकुंड,फळे, खोबऱ्याचे तुकडे (प्रत्येकी ५ नग), नारळ, नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या, आंब्यांचे डहाळी , पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, शेंदूर, हळद, कुंकू, अक्षदा, प्रसादाकरिता मोदक आणि इतर नैवेद्य, मिठाई.

गणेश विसर्जन २०२४ कधी आहे- 

गणेश उत्सव किंवा गणेशोत्सव १० दिवस चालतो. काहीजण आपल्या परंपरेनुसार १, दीड, ३, ५, ७ दिवसही गणपती बसवतात. परंतू १० दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. या दिवसाला गणेश विसर्जन असेही म्हणतात. यावर्षी गणेश विसर्जन १७ सप्टेंबर २०२४ रोजी मंगळवारी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक बाप्पाला निरोप देतात. तलाव किंवा नदीत गणपतीची मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा आहे.

विभाग