Ganesh Chaturthi 2024 Vastu Tips : दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत करतात. गणेश पुराण आणि स्कंद पुराणानुसार भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता. गणपती बाप्पा प्रथम पुजनीय मानले जातात यामुळे कोणतीही पूजा किंवा विधी सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. जाणून घेऊया गणेश चतुर्थीला कोण-कोणते शुभ योग आहे आणि गणेशाची मुर्ती कोणत्या दिशेला स्थापन करावी.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३१ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३७ वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी व्रत करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
पंचांगानुसार गणेश चतुर्थीला ब्रह्म योगासोबत सर्वार्थ सिद्धी योग आणि इंद्र योग, चित्रा आणि स्वाती नक्षत्रही तयार होत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाचा जन्म मध्यान्ह काळात झाला होता. म्हणूनच गणेशपूजेसाठी मध्यान्हाची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. ७ सप्टेंबर रोजी मध्यान्ह गणेश पूजनाचा मुहूर्त सकाळी ११:३ ते दुपारी १:३४ पर्यंत असेल, ज्याचा कालावधी - २ तास ३१ मिनिटे आहे. त्याचबरोबर १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होणार आहे.
तुम्हीही गणपतीची मूर्ती घरी आणत असाल किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना करत असाल तर दिशा नक्की लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्रानुसार देवाची मूर्ती योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने स्थापित करणे महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करावी. ईशान्य कोपऱ्यात रिकामी जागा नसल्यास, मूर्तीची स्थापना पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेलाही करता येते.
महाराष्ट्रासह देश-विदेशातही या सणाला खास महत्त्व दिले जाते. गणेश चतुर्थीला लोक मोठ्या थाटामाटात आणि वाद्य वाजवून गणपतीची मूर्ती घरी आणतात. हा उत्सव १० दिवस चालतो. काहीजण आपल्या सोयीनुसार १, दीड, ३, ७ दिवसही गणेशोत्सव साजरा करतात. गणपतीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो.