Ganeshotsav 2023 Mumbai : येत्या १९ सप्टेंबर पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोकणासह मुंबईत गणेशोत्सवाचा सर्वात जास्त जल्लोष पाहायला मिळत असतो. गणेशोत्सवाच्या संपूर्ण १० दिवस शहरातील अनेक भागांमध्ये भाविक गणेशमय झालेले असतात. अनेक लोक हातातले काम सोडून शहरातील वेगवेगळ्या मंडळातील गणेशमूर्ती, त्यांची सजावट आणि अन्य गोष्टी पाहण्यासाठी गर्दी करत असतात. मुंबईतील खेतवाडीचा राजा या गणेश मंडळाकडून गणेशोत्सवाच्या काळात मंडपाची आकर्षक सजावट करण्यात येत असते. त्यामुळं मोठ्या संख्येने भाविक गणेशमूर्तीची सजावट पाहण्यासाठी गर्दी करतात.
मुंबईतील खेतवाडीचा राजा या गणेश मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून एकाच स्वरुपाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत असते. तब्बल १२ लेनमध्ये गणेश मंडळांकडून मंडपांची सजावट करण्यात येत असते. या लाईनमध्ये १२ व्या लेनमधील गणेशमूर्ती सर्वात सुंदर आणि आकर्षक मानली जाते. याशिवाय अतिशय खास पद्धतीने सजावट करण्यात येत असल्याने देखील भाविकांची आरतीवेळी मोठी गर्दी होते. गणेशमूर्तीचा आकार तब्बल ४० फूटांचा असतो. त्यामुळं यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच भाविकांनी खेतवाडीचा राजाला भेट देण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबईतील खेतवाडीच्या राजाची स्थापना १९५९ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर २००० साली या मंडळाकडून सर्वात उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्वात उंच गणपतीची स्थापना करत मंडळाने मोठा विक्रम केला. त्यानंतर या मंडळाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. मंडळाकडून सोने, चांदी, हिरे, माणिक आणि मोती या ज्वेलरींच्या माध्यमातूनही गणेश मूर्तीला सजवण्यात येत असतं. त्यामुळं मुंबईसह महाराष्ट्र आणि भारतातील अनेक राज्यांतून भाविक खेतवाडीच्या राजाला पाहण्यासाठी गर्दी करत असतात.
दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत खेतवाडी राजा गणपतीला पाहण्यासाठी भाविकांची सर्वात जास्त गर्दी असते. त्यासाठी सर्वात आधी चन्नी रोड रेल्वे स्टेशनवर जायला हवं. याशिवाय सँडहर्स्ट रेल्वे स्थानकावरूनही तुम्ही खेतवाडीच्या राजाकडे जाऊ शकता. या दोन्ही रेल्वे स्टेशनवरून तुम्ही १५ मिनिटं पायी चालत थेट खेतवाडी गणपती उत्सवात पोहचू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)