Falgun Amavasya 2024 Date, Time, Rituals and Significance : हिंदू धर्मात अमावस्या तिथीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक अमावस्येला स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे. ही तिथी दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवशी येते. पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी अमावस्येचा दिवस उत्तम मानला जातो. यासोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठीही हा दिवस खूपच खास आहे.
अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करणे याला खूप महत्त्व आहे, याशिवाय पितरांसाठी अर्पण करणे आणि दान करणे हे शुभ मानले जाते. या महिन्यातील अमावस्या तिथी कोणत्या दिवशी आहे, स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
फाल्गुन महिन्याची अमावस्या – रविवार, १० मार्च २०२४
फाल्गुन महिन्याची अमावस्या तिथी सुरू होते - ९ मार्च २०२४ शनिवारी, संध्याकाळी ६:१७ पासून.
फाल्गुन महिन्याच्या अमावस्या तिथीची समाप्ती - रविवार, १० मार्च २०२४ रोजी दुपारी २:२९ वाजता समाप्त होईल.
या दिवशी फाल्गुन अमावस्येला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ४.४९ ते ५.५८ पर्यंत असेल. तर, अभिजित मुहूर्त दुपारी १२.०८ ते १.५५ पर्यंत असेल.
हिंदू धर्मात पितरांची शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथी सर्वोत्तम मानली जाते. फाल्गुन महिन्यातील या अमावस्येला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी जे लोक तीर्थयात्रा करतात, स्नान करतात आणि दान करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे.
जे लोक पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करू शकत नाहीत, त्यांनी प्रत्येक अमावस्येला विधीपूर्वक पितरांना जल अर्पण करावे आणि कर्मकांडपंडितांना दान व दक्षिणा द्यावी. तसेच, गरजूंना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. तसेच या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने इच्छित फल प्राप्त होते.
१) फाल्गुन अमावस्येला भगवान शिवाची पूजा करा. शिव सहस्त्रनाम किंवा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा नियमित पठण केल्याने शनीच्या प्रकोपाची भीती दूर होते आणि सर्व अडथळे दूर होतात. याशिवाय पितरही प्रसन्न होतात.
२) फाल्गुन अमावस्येला दानधर्म करण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी गरीब लोकांना अन्नदान करणे आणि पैसे दान करणे चांगले आहे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने पितरांची कृपा प्राप्त होते. या दिवशी तुम्ही तुमच्या भक्तीप्रमाणे कपडे, साखर, धान्य इत्यादी वस्तूही दान करू शकता.
३) फाल्गुन अमावस्येला पितरांना प्रसन्न करायचे असेल तर पशु-पक्ष्यांना खाऊ घाला. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते.
४) फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावा आणि त्या झाडाची सेवा करा. असे केल्याने पितर संतुष्ट होतात आणि त्यांचे दुःख कमी होते आणि त्यांचा क्रोध दूर होतो.
५) फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान, जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे, म्हणून या दिवशी पवित्र नदीत स्नान करून इतर विशेष वस्तूंचे दान करावे. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. या दिवशी, आपल्या पूर्वजांच्या तारणासाठी प्रार्थना करा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)