वर्षातून एकदा सौदी अरेबियात जाणारे मुस्लीम हज यात्रेकरू इस्लामचा एक आधारस्तंभ असलेल्या हज यात्रेसाठी विविध धार्मिक विधी आणि उपासना कार्यात एकत्र येतात. जेव्हा ते एक धार्मिक कर्तव्य पार पाडतात, तेव्हा ते त्यांच्यासाठी आयुष्यभराचा आध्यात्मिक अनुभव आणि मागील पापांचा नाश करण्याची संधी असते ज्यात ते स्वतःला झोकून देतात. ही तीर्थयात्रा आणि मुस्लिमांसाठी त्याचे महत्त्व काय आहे जाणून घ्या.
हज ही सौदी अरेबियातील मक्केची वार्षिक इस्लामी तीर्थयात्रा आहे. इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार, शारिरीक आणि आर्थिकरित्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे. हज हा इस्लामच्या पाच कर्तव्यांपैकी एक कर्तव्य आहे.
इस्लामी कॅलेंडर वर्षातील १२ वा आणि शेवटचा महिना धुल-हिज्जा या इस्लामी चांद्र महिन्यात वर्षातून एकदा हज यात्रा केली जाते. यावर्षी हज यात्रा याच महिन्यात १४ जून पासून सुरू होणार आहे.
दरवर्षी जून महिन्यात हज यात्रा होते. जगभरातून लाखो इस्लामधर्मीय हज यात्रेसाठी रवाना होतात. हज यात्रेकरूंसाठी हज करणे हे धार्मिक कर्तव्य आहे, परंतु अनेकांसाठी हा आयुष्यभराचा गहन आध्यात्मिक अनुभव देखील आहे. मागील पापांसाठी क्षमा मागण्याची एक संधी म्हणून याकडे पाहिले जाते. सांप्रदायिकदृष्ट्या, हज जगभरातील विविध वंश, भाषा आणि आर्थिक वर्गातील मुस्लिमांना एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एकत्रीत आणते. त्यामुळे अनेकांना एकता, नातेसंबंध, नम्रता आणि समतेची भावना निर्माण होते. यात्रेकरू स्वत:चे वैयक्तिक आवाहन, इच्छा आणि अनुभव घेऊन हज यात्रेत हजेरी लावतात.
अनेक मुस्लिम लोक आपल्यासोबत कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून संदेश घेऊन येतात आणि त्यांच्यावतीने ते म्हणतात. हज यात्रा पाच दिवस चालते. ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदला ही यात्रा संपन्न होते.
हज यात्रा यशस्वी संपन्न व्हावी याकरीता अनेक अनुभवी यात्रेकरू कडून यासंबंधी सल्ला घ्यावा असे सांगितले जाते. हज यात्रेसाठी सौदी अरेबिया कडून विशेष नियोजन केले जाते. ईराण, तुर्किये, इजिप्तसह इतर अनेक देशांमधून भाविक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जात असतात. काही वेळा यात्रेदरम्यान भाविकांना तीव्र उष्णता किंवा इतर आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागते.
हज यात्रेकरू सर्वप्रथम सौदी अरेबियातील जेद्दा शहरात दाखल होतात. तिथून ते मक्का शहराकडे रवाना होतात. पण मक्केपूर्वी एक विशिष्ट असं ठिकाण आहे, तिथूनच हज यात्रा अधिकृतरित्या सुरू होते.
हज यात्रेकरू हज यात्रेचा इरादा करतात आणि ते "अहराम" घालून प्रवेश करतात. हज यात्रेकरू एक विशिष्ट असा पोशाख परिधान करतात, त्याला अहराम असं संबोधलं जातं. अहराम म्हणजे हे फक्त पांढऱ्या रंगाचं कापड असतं. ते कुठेही शिवलेलं नसतं.
हज यात्रेतील लोकं आधी अराफात मैदानात पोहोचतात. या मैदानावर उभे राहून भाविक अल्लाहचं स्मरण करतात. आपल्या गुन्ह्यांबाबत माफीही मागतात. त्यानंतर संध्याकाळी ते मुजदलफा शहरात जातात.
यानंतर जमारात नामक एक विधी होतो. यात प्रतिकात्मक स्वरुपात सैतानाला दगड मारले जातात. सैतानाला मारल्यानंतर बाजूला बकऱ्याची कुर्बानी देण्यात येते. इथे पुरुष आपलं मुंडण करून घेतात. मुंडण केल्यानंतर यात्रेकरू मक्काला परततात. इथे काबाच्या ७ फेऱ्या मारण्याची परंपरा आहे. या विधीला तवाफ असं संबोधलं जातं.
ईद-उल-अजहा किंवा "कुर्बानीची मेजवानी" ही इस्लामी सुट्टी आहे जी हज दरम्यान धुल-हिज्जा या इस्लामी चांद्र महिन्याच्या १० व्या दिवशी बकरी ईद म्हणून साजरी केली जाते. ईद-उल-अजहा हा पैगंबर इब्राहीम यांच्या श्रद्धेची परीक्षा देणारी एक घटना आहे, यात ईश्वराला शरण जाण्यासाठी आपल्या मुलाचा बळी देण्याची त्यांची तयारी होती. ईद उल-अजहाला ईद - ए - कुर्बानी असेही म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या दिवशी सर्व नियमांचे पालन करत ‘हलाल’ प्राण्यांची कुर्बानी दिली जाते.