Dussehra 2024 Puja : दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. पंचांगानुसार या वर्षी १२ ऑक्टोबरला विजयादशमी आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन, अपराजिता देवी पूजा, शमी पूजा आणि रावण दहन केले जाते.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा पवित्र सण आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचे रुप धारण करुन महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तसेच, रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्याच्या शस्त्रांची पूजा केली. त्याच वेळी महिषासुराशी युद्धासाठी देवतांनी मिळून दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली. जाणून घेऊया दसऱ्याला शस्त्र पूजेची शुभ वेळ आणि पूजनाची पद्धत...
पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी १२ ऑक्टोबरला सकाळी १०:५८ वाजता सुरू होईल आणि १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९:०८ वाजता समाप्त होईल. तर, यावर्षी दसरा १२ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे.
दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तामध्ये शस्त्र पूजा केली जाते. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिटे ते २ वाजून ४९ मिनिटापर्यंत असेल. या मुहूर्तावर शस्त्रांची पूजा करता येईल.
या दिवशी रवि योगासह सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. या योगात कोणतेही काम केल्यास ते यशस्वी होईल असे सांगितले जाते. दसऱ्याला रवि योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल.
दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे. आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला. यानंतर विजय मुहूर्तावर शस्त्रांची पूजा सुरू करा. सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून शुद्ध करा. यानंतर हातांवर हळद-कुंकूचा टिळा लावावा. फुले आणि शमीची पाने अर्पण करा. गरीब आणि गरजूंना अन्न द्या. यानंतर दान द्या. नवरात्रीच्या नऊ दिवसांनी दशमी तिथीला यशासाठी प्रार्थना करून चंद्रिकेचे स्मरण करून शस्त्रांची पूजा करावी. विजयादशमीच्या दिवशी कालीका मातेची पूजा केली जाते.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या