Dr Babasaheb Ambedkar : महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि बाबासाहेबांची भूमिका
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Dr Babasaheb Ambedkar : महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि बाबासाहेबांची भूमिका

Dr Babasaheb Ambedkar : महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि बाबासाहेबांची भूमिका

Mar 20, 2024 11:38 AM IST

Mahad Chavdar Tale Satyagraha : २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. हा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी समाजात बंधूता, समता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केले. आजही महाडचा हा ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह सर्वांनाच लक्षात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (हिंदुस्तान टाइम्स)

Mahad Chavdar Tale Satyagraha : पाच हजार बांधवांना आपल्या सोबत घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं चवदार तळं गाठलं आणि त्या तलावाचं पाणी पिऊन हिंदू धर्मातला जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ साली झाला. आज २० मार्च २०२३. आज त्या घटनेला जवळपास ९५ वर्ष पूर्ण झाली. 

का झाला सत्याग्रह?

महाडच्या चवदार तळ्याचं पाणी त्या काळी समाजातल्या काही प्रतिष्ठीत घटकांसाठीच मर्यादीत होतं. इतर कोणीही तिथं जाऊ शकत नसे. ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निदर्शनास आली. त्यात त्यांना त्यावेळच्या उच्च घटकातल्या काही महत्वाच्या व्यक्तींचीही साथ मिळाली. 

टिपणीस, सहस्त्रबुद्धे, चित्रेंची मिळाली भक्कम साथ

त्याकाळी महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सर्व सरकारी मालमत्ता समाजतल्या सर्व घटकांना खुली आहेत, कोणीही सरकारी मालमत्तेवर आपला दावा सांगू शकत नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर टिपणीसांच्याच बरोबरीने अनंत चित्रे, गंगाधर सहस्त्रबुद्धे अशा समाजातल्या त्याकाळच्या प्रतिष्ठीत आणि पुरोगामी विचारांच्या व्यक्तींनीही टिपणीस यांच्या भूमिकेला पाठींबा दिली. बाबासाहेबांना तिथं सभा घेण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. 

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस काय म्हणाले बाबासाहेब

तिथं पोहोचल्यावर आधी महाडच्या चवदार तळ्याचं पाणी बाबासाहेब यांनी आपल्या ओंजळीनं प्यायलं आणि मग शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ऐतिहासिक केला. 

यावेळेस बोलताना,  “चवदार तळ्याचा सत्याग्रह हा आम्हीही इतरांप्रमाणेच माणसं आहोत, हे सिद्ध करण्याकरीता केला” असल्याचं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पुढे बाबासाहेब म्हणाले होते की, “चवदार तळ्याचं पाणी प्यायल्याने तुम्ही किंवा मी अमर होणार नाही. आजवर आपण या चवदार तळ्याचं पाणी प्यायलो नव्हतो, म्हणून काही मेलो नव्हतो. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा बंधुता वाढीस लागावी आणि जातीभेदाच्या भिंती संपुष्टात याव्यात यासाठी केलेला सत्याग्रह आहे” असं सांगितलं होतं. 

या सत्याग्रहानंतर हा दिवस समता दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही ओळखला जातो. 

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर